
मुंबई : (Security Guards Board) राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांना आता खाकी रंगाचा गणवेश मिळणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी त्यास मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे. त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश दि. १ मेपासून राज्यभरात अंमलात येणार असल्याची मंत्री फुंडकर यांनी केली.
महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे अनावरण कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते नरिमन भवन येथे करण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या गणेशाच्या रंग खाकी असावा, अशी मागणी विविध संघटना व सुरक्षारक्षकांनी शासनाकडे केली होती. कामगार मंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. राज्यभरात जिल्हानिहाय १६ सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून, आता १ मे पासून त्यांच्या गणवेशात एकसमानता येणार आहे.
या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एकसंध राहील व त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल. तसेच या नव्या गणवेशामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितले.