मुंबई : गेल्या २३ वर्षांपासून रंगभूमीवर अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेलं ‘सही रे सही’ हे नाटक आजही तितकंच ताजं आणि लोकप्रिय आहे. मराठमोळ्या हास्यनायक भरत जाधव यांच्या दमदार अभिनयाने सजलेलं हे नाटक आजवर ४ हजारांहून अधिक प्रयोग गाठून रंगभूमीवरचा विक्रम प्रस्थापित करत आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच या नाटकाबाबत एक अत्यंत मोलाचं विधान केलं आहे. “सही रे सही कधी बंद होणार?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर भरत जाधवप्रेमींसाठी अत्यंत भावनिक ठरणारं आहे.
केदार शिंदे म्हणाले, "हे नाटक मी लिहिलं आणि बसवलं, पण त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं खरं श्रेय भरतला जातं. भरत हा शिस्तप्रिय नट आहे. गेली २३ वर्षं तो एका लयीत, न थकता हे नाटक करत आहे. मी जेव्हा २ तास २० मिनिटांचं नाटक बसवलं होतं, ते आजही अक्षरशः तसंच सुरू आहे. हे नाटक बंद कधी होईल, तर त्यादिवशी जेव्हा भरत म्हणेल – 'आता माझ्या आवाक्यात नाही.' कारण त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही."
केवळ ‘सही रे सही’ नव्हे, तर नाटक हेच आपलं सगळ्यात प्रिय माध्यम असल्याचं शिंदे स्पष्ट करतात. "नाटक ही एक जिवंत कला आहे. पडदा उघडल्यावर सगळं नटाचंच असतं. मालिका म्हणजे लेखकाचं माध्यम, कारण कथा त्यानं मांडलेली असते. तर चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं असतं – सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक निर्णय त्याचा असतो. पण नाटक – तिथे प्रयोग करायला मोकळं वातावरण असतं. सकाळी १० पासून रात्रीपर्यंत २ महिने मी तालमी घेतो. शेवटी डॉक्टरांना बोलवावं लागतं कलाकारांना इंजेक्शन द्यायला, इतकी मेहनत घेतली जाते," असं सांगताना ते रंगभूमीविषयीचं आपलं प्रेम अधोरेखित करतात.
भरत जाधव आणि केदार शिंदे यांची ही जोडी गेली दोन दशके मराठी रंगभूमीवर हास्याचं आणि कौटुंबिक नात्याचं अनोखं रसायन उभं करत आहे. सही रे सही ही केवळ एक विनोदी नाट्यकृती नसून, ती एक सजीव परंपरा बनली आहे – जी भरत जाधवसारख्या समर्पित कलाकारामुळे आजही टवटवीत आहे.