दक्षिण आफ्रिका ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प; टॅग लावलेल्या 'चिऊलुआन-२' अमूर ससण्याचे स्थलांतर सुरू

29 Apr 2025 11:35:57
chiuluan 2 amur falcon



मुंबई (अक्षय मांडवकर) -
'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) मणिपूरमध्ये 'सॅटेलाईट टॅग' लावलेल्या 'चिऊलुआन-२' नामक अमूर ससाणा पक्ष्याने हिवाळी स्थलांतरादरम्यान नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका गाठले होते. पाच महिने त्याठिकाणी राहिल्यानंतर या पक्ष्याने ८ एप्रिल रोजी बोत्स्वाना येथून परतीचा प्रवास सुरू केला आणि अरबी समुद्रावरुन उड्डाण करत गुजरातमार्गे या पक्ष्याने २८ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प गाठले. या स्थलांतरादरम्यान या पक्ष्याने अरबी समुद्रावरुन न थांबता ३ हजार १०० किलोमीटर उड्डाण केले. (chiuluan 2 amur falcon)
 
 
दरवर्षी अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन ते आफ्रिका, असे दूरवरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करुन हे पक्षी हिवाळ्यासाठी आफ्रिकेत जातात. यादरम्यान ते भारतातील नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी 'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांकडून या पक्ष्यांना 'सॅटलाईट टॅग' लावण्यात येतात. लांब पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे उड्डाण मार्ग आणि या मार्गावरील पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी २०१६ सालापासून 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'च्या परवानगीने ससाणा पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासाअंतर्गत 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांनी आठ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये दोन अमूर ससाणा पक्ष्यावर 'सॅटलाईट टॅग' बसवले आणि त्यांना सोडून दिले. त्यामधील नर पक्ष्याचे नाव 'चिऊलुआन-२' आणि मादीचे नाव 'गुआनग्राम' ठेवण्यात आली. स्थानिक गावांच्या नावावरुन ही नावे ठेवण्यात आली. त्यामधील 'चिऊलुआन-२' या नर अमूर ससाण्याने १४ ते २७ नोव्हेंबर अशा १३ दिवासांमध्ये या पक्ष्याने मणिपूर ते केनिया असा ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास केला. या कालवधीत तो सांगलीतील कडेगावमध्ये थांबला होता आणि त्यानंतर गुहागरमधील गोपाळगडाच्यामार्गे अरबी समुद्रात प्रवेश करुन आफ्रिका गाठले होते.
 
 
बोत्स्वाना आणि दक्षिण आफ्रिकेच्या सीमावर्ती भागामध्ये 'चिऊलुआन-२' पाच महिने राहिला. त्यानंतर ८ एप्रिल रोजी त्याने बोत्स्वानामधून परतीचा प्रवास सुरू केला. १३ एप्रिल रोजी त्याने केनिया गाठले. २५ एप्रिल रोजी त्याने सोमालियाच्या किनाऱ्यावरुन भारताच्या दिशेने उड्डाण सुरू केले. २६ आणि २७ एप्रिल रोजी अरबी समुद्रात कुठे थांबता २८ एप्रिल रोजी 'चिऊलुआन-२' हा गुजरातच्या किनाऱ्यावर धडकला. तिथेही न थांबता आपला प्रवास सुरु ठेवून त्याने नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करुन शहादा गाठले आणि २८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये पोहोचल्याची माहिती 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर सुरेश कुमार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलता दिली.
Powered By Sangraha 9.0