मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात संजय लेले, दिलीप डिसले, कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
हे वाचलंत का? - लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मंगळवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासोबत त्यांचे शिक्षण आणि रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहलगाम हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचादेखील मृत्यू झाला. दरम्यान, त्यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.