मुंबई (Bullet Train): “राज्यात २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील भारत-मध्य पूर्व-युरोप इकोनॉमी कॉरिडॉर समिट २०२५ मध्ये ते बोलत होते.
“उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात कूर्मगतीने सुरू होता. उलट या सरकारच्या काळात तो बंद कसा पडेल, या दृष्टीने प्रयत्न झाले,” अशी टीका फडणवीसांनी नाव न घेता केली. “गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण आणि इतर कामे वेळेत पार पडली. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर आम्ही प्रधान्याने कामे सुरू केली. इथली कामे वेगाने सुरू असून २०२८ पर्यंत पूर्णतः बुलेट ट्रेन महाराष्ट्रात धावेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
५०८ किमी लांबीचा असलेला मुंबई-अहमदाबाद हा प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. ‘शिंकानेस’ हे जपानी तंत्रज्ञान बुलेट ट्रेन निर्मितीसाठी वापरले जात आहे. बुलेट ट्रेन ३२० किमान, तर ३५० कमाल वेगाने धावणार आहे. ५०८ किमीपैकी १५४.७६ किमी मार्ग महाराष्ट्रातून जातो. वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार आणि बोईसर ही बुलेट ट्रेनची महाराष्ट्रातील स्थानके आहेत.
‘ईज ऑफ डूइंग बिजनेस’मध्ये महाराष्ट्र अव्वल येईल
“ईज ऑफ डूइंग बिजनेस’मध्ये महाराष्ट्र २०२९ पर्यंत देशात पहिले स्थान मिळवेल. गुंतवणूकदारांना सुलभ सेवा देण्यासाठी ‘मैत्री’ पोर्टल आणि ‘सिंगल विंडो सिस्टम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या ‘जेएनपीटी’पासून नागपूरपर्यंत मालवाहतूक फक्त आठ तासांत करता येते आणि वाढवण बंदरामुळे ही गती अधिक वाढेल. नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ‘कार्गो हब’ विकसित होत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अटल सेतुमुळे तिसर्या मुंबईचा विकास होत आहे. येथे एज्यु-सिटी, हेल्थ-सिटी व इनोव्हेशन-सिटी उभारली जात असून विविध नामांकित विद्यापीठे येथे आपली केंद्रे स्थापन करणार आहेत,” अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
मुंबईत ५० अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक शक्य
“मुंबईत सागरी किनारा रस्ता, अटल सेतू आणि विविध मेट्रो मार्गांचे प्रकल्प सुरू असून या सर्व विकासकामांमुळे मुंबईत अंदाजे ५० अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक होण्याची शक्यता आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे सध्या अस्तित्वात असलेल्या ‘जेएनपीटी’पेक्षा तीनपट मोठे असेल. ते प्रवेश नियंत्रित महामार्गाद्वारे नाशिक व समृद्धी महामार्गाशी जोडले. वाढवण बंदर परिसरात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चौथ्या मुंबईचा विकास प्रस्तावित आहे. नदीजोड प्रकल्पाद्वारे कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम घाटातील पाणी उजनी धरण व मराठवाड्याकडे वळवले जाणार असून, यामुळे भविष्यात मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. समृद्धी महामार्गानंतर नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे,” असे ते म्हणाले.