मुंबई : देशावरील भयाण संकटावेळी देशातील नागरिकांच्या पाठीशी उभे न राहता पाकिस्तानी दहशतवाद्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसचा छुपा अजेंडा दिसतो, असा घणाघात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २९ एप्रिल रोजी केला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी निर्घृण हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांबद्दल शोक संवेदना व्यक्त होत आहेत. अशा शोकसंतप्त वातावरणात देशातील नागरिकांच्या पाठीशी उभे न राहता काँग्रेस पक्ष पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांना बळ देण्याचे घृणास्पद कृत्य करीत आहे, त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करीत आहे."
हे वाचलंत का? - काँग्रेसी मानसिकता पाकिस्तानशी मिळती जुळती! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
"काँग्रेस पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अपमान करणारे चित्र प्रसिद्ध केले आहे. सर तन से जुदा ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची मानसिकता असून हीच दहशतवादी मानसिकता काँग्रेस पक्षाने या चित्रातून व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाच्या या देशविरोधी कृत्याचे पाकिस्तानात स्वागत होत आहे, ही या पक्षासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. हा या देशातील नागरिकांचा अपमान आहे. या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या बलिदानाचा हा अवमान आहे. दहशतवादी कृत्यामुळे जेवढ्या वेदना या कुटुंबियांना झाल्या नाहीत, त्यापेक्षा कितीतरी अधिक तीव्र वेदना काँग्रेस पक्षाच्या देशविरोधी कृत्यामुळे झाल्या आहेत. देशावरील या भयाण संकटावेळी देशातील नागरिकांच्या पाठीशी उभे न राहता पाकिस्तानी दहशतवाद्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसचा हा छुपा अजेंडा दिसतो. या देशातील जनता काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना कधीही माफ करणार नाही," असेही ते म्हणाले.