मुंबई, विक्रोळीतील गांधीनगर जंक्शन येथे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारणीचे कार्य सुरू आहे. येथे एलबीएस रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल, मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन ४ अशा चार वाहतूक मार्गांचा संगम होत आहे. या ठिकाणी, २४ मीटर उंचीवर आणि चालू वाहतुकीदरम्यान सुमारे ५४० मेट्रिक टन वजनाचा, ६२.७ मीटर लांबीचा विशेष स्टीलचा पूल टप्प्याटप्प्याने बसवला जात आहे. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून ३० मीटर लांब गर्डर यशस्वीपणे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड लिंक व मेट्रो लाईन ६ च्या खाली स्थापित करण्यात आला असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित १७ मीटर, विक्रोळीच्या बाजूला आणि १५ मीटर, मुलुंडच्या बाजूला गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही कामगिरी मेट्रो लाईन ४ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर) अत्यंत महत्त्वाची आहे आणि डिसेंबर, २०२६ पर्यंत हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ही मेट्रो लाईन कार्यान्वित झाल्यानंतर गायमुख (ठाणे) ते कांजूरमार्ग या मार्गावर सुलभ व जलद प्रवास शक्य होईल, तसेच ठाणे, मुलुंड व कांजूरमार्ग यासारख्या उपनगरांना उत्तम मेट्रो जोडणी मिळेल. गांधीनगर येथे उभारला जाणारा प्रत्येक पूल म्हणजे मुंबईच्या जलद आणि शाश्वत विकासाकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.