संजय गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांकडून समज!

26 Apr 2025 19:33:19
 
Devendra Fadanvis Sanjay Gaikvad
 
पुणे : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पोलिसांबद्दल असे बोलणे योग्य नाही, असे मला वाटते. संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी हे मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे. हे असे चालणार नाही आणि हे योग्य नाही. ते वारंवार असे बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
 
हे वाचलंत का? -  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर!
 
...तर ते १०० वर्षे मला मुख्यमंत्री ठेवतील!
 
मुख्यमंत्रीपदाबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना ते म्हणाले की, "बावनकुळे साहेबांच्या हातात असले तर ते १०० वर्षे मला मुख्यमंत्री ठेवतील. त्यांच्या शुभेच्छा माझ्या चांगल्याकरिता आहे. राजकारणात भूमिका बदलत असतात ती फार दीर्घकाळ राहात नाही. त्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा आहे तेव्हा बदलेल."
 
 
 
Powered By Sangraha 9.0