"दीर्घकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी हिंदूंना भारत सोडावा लागणार नाही!"; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती

25 Apr 2025 12:20:49

pakistani hindus with long-term visas not affected by visa ban, mea clarifies
 
नवी दिल्ली : (Pakistani Hindus With LTV Not Affected By Visa Ban) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. भारत सरकारने या हल्ल्याला जबाबदार धरत पाकिस्तान कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाचा दीर्घकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी हिंदूंवर कोणताही परिणाम होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
हा नियम ज्या पाकिस्तानी हिंदूंना लागू होणार नाही
 
आता केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित करण्याबाबत एक नवीन निवेदन जारी केले आहे. निर्णयानुसार, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध भारतीय व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकार कडक राजनैतिक आणि सुरक्षा उपाययोजना करत आहे. पण, व्हिसाबद्दल भारत सरकारचा हा नियम ज्या पाकिस्तानी हिंदूंना दीर्घकालीन भारतीय व्हिसा (LTV)देण्यात आला आहे, त्यांना लागू होणार नाही. त्यांना देश सोडावा लागणार नाही. नागरिकत्व सुधारणा कायदाअंतर्गत, शेजारील इस्लामिक देशांमधील पीडित हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. याबाबतची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
 
 
भारतीयांनी पाकिस्तान प्रवास टाळावा - परराष्ट्र मंत्रालय
 
परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असतील. सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी सुधारित व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा. भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही शक्य तितक्या लवकर भारतात परतण्याचा सल्ला देण्यात येत आहे."
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0