श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लाली ठार झाला आहे. सकाळपासूनच इथे शोधमोहिम सुरू होती. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ही मोहिम अधिक तीव्र केली होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यानंतर चकमक आणखी तीव्र झाली. यात अल्ताफ लाली मारला गेला.
सुरक्षा बलांनी सकाळापासूनच बंदीपोऱ्यात शोधमोहिम सुरू केली होती. यापूर्वी एक जण चकमकीत जखमी झाला होता. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू झाला. त्याला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाचे दोन जवान यात जखमी झाले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा चौथा एन्काऊंटर असल्याची माहिती आहे.
गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी सुरक्षादलांनी उधमपुरच्या डूडू बसंतगढमध्ये काही दहशतवाद्यांना घेराव घातला होता. यात सैन्याचा एक जवान हुतात्मा झाला. बांदीपोरा पोलीसांनी लष्कर-ए-तोयबाच्या चार ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना अटक केली होती. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही अतिरेकी स्थानिकांना लक्ष्य करण्याच्या तयारीत आहेत. याच माहितीच्या आधारे पोलीसांनी तपास मोहिम कडक केली. काश्मीरमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे जागोजागी शोधमोहिम राबविण्यात येणार आहे.
दहशतवादी हल्ला करणाऱ्यांची घरे स्फोटात उध्वस्त
पहलगाम दहशतवाही हल्ल्यातील कटात अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. दोन दहशतवाद्यांची घरे ही स्फोटात उध्वस्त झाली आहेत. गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी दोघांची घरे उध्वस्त करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. आदिल हुसैन थोकर आणि आसिफ शेख या दोन दहशतवाद्यांच्या घरात सुरक्षा दल तपासणी करत होते. त्यावेळी तिथे पूर्वीपासून ठेवण्यात आलेल्या स्फोटकांमुळे घर उध्वस्त झाले.