सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या 'उबाठा'ला जनता माफ करणार नाही!

25 Apr 2025 18:49:46
Will Rahul Gandhi respect the Supreme Court?


मुंबई, "उबाठा गट या देशाचा इतिहास विसरलेला दिसतो. युद्धाची किंवा युद्धसदृश्य परिस्थिती असताना आणि देशावर हल्ला झालेला असताना, भारतातील राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. हा या देशाचा इतिहास आहे. मात्र अशा परिस्थितीत उबाठा गटाकडून विरोध करणे, उपहास करणे किंवा मूर्खासारखी वक्तव्ये करणे सुरू आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी केला.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, बांगलादेशच्या युद्धादरम्यान देशात राजकीय पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होता. तरीही स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्व. इंदिरा गांधींना पूर्ण पाठिंबा दिला होता. ही या देशाची परंपरा राहिली आहे. पहलगाम येथे धर्म विचारून गोळ्या घातलेल्या नाहीत, असे शरद पवार म्हणाले असल्याचा प्रश्न माध्यमांनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांचे विधान मी ऐकलेले नाही. पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले आहेत, ते काय म्हणाले, हे मी ऐकलेले आहे. शरद पवारांनीही आप्तेष्टांचे म्हणणे ऐकावे.

पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत देश सोडावा

पाकिस्तानचे जे नागरिक भारतात आले आहेत, त्यांनी पुढील ४८ तासांत देस सोडावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागेल अन्यथा कारवाई केली जाईल. त्यांची यादी तयार केली जात आहे. पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू यांच्याबाबतीतही आमच्या मनात कोणतीही सहानभूती नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना जागा दाखवली

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानेच चपराक लावलेली आहे. आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? हा माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य संग्राम सैनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला आपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो की त्यांनी राहुल गांधींना त्यांची जागा दाखवली. भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानीत करत होते आता ते यापुढे अपमानीत करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



Powered By Sangraha 9.0