मुंबई पालिका करणार धार्मिक स्थळांची स्वच्छता

- २८ एप्रिल ते ९ मेदरम्यान विशेष मोहिम

    25-Apr-2025
Total Views |

Special campaign - Mumbai Municipal Corporation will clean religious places

मुंबई : ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ अभियानांतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, मैदाने, शाळा आदींच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. त्यानंतर आता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.

मुंबईतील स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आदींच्या सामूहिक प्रयत्नांतून दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ दरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान संपूर्ण मुंबईत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने संपूर्ण मुंबई महानगरात नियमितपणे स्वच्छता केली जाते. तथापि, अत्यंत सखोल आणि व्यापक पद्धतीने स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित धार्मिक स्थळाशी निगडित विश्वस्त आणि अन्य प्राधिकृतांशी समन्वय साधून त्याठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाईल.

प्रामुख्याने धार्मिक स्थळाभोवतालचा परिसर, वाहनतळ, घनकचरा संकलनाचे ठिकाण, पदपथ आदींची यांत्रिक तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने व्यापक स्वच्छता करण्यात येईल. अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तूंचे निष्कासन, कचऱ्याचे संकलन आणि पाण्याने संपूर्ण परिसर धुवून काढणे आदी प्रक्रियांचा देखील यामध्ये समावेश असेल. स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत विभागीय कार्यालयांनी (वॉर्ड) सक्रियपणे सहभाग नोंदवण्याच्या सूचनाही किरण दिघावकर यांनी दिल्या आहेत.