मुंबई पालिकेसमोर साकारणार ‘टाऊनहॉल जिमखाना’

24 Apr 2025 15:46:33
 
town hall gymkhana
 
मुंबई (Town Hall Gymkhana): मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली ’टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय व सभोवतालचा संपूर्ण परिसर हा मुंबई शहरातील सर्वाधिक महत्वाच्या वारसा परिसरमध्ये (हेरिटेज प्रीसिंक्ट) समाविष्ट केलेला आहे. पुरातन वारसा, वास्तुशिल्प व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणार्या या परिसरात आझाद मैदानासारखे ऐतिहासिक प्रमुख क्रीडांगण आहे. तसेच मेट्रो-३ सेवेच्या रुपाने महत्त्वाचे स्थानकदेखील या भौगोलिकतेमध्ये आता जोडले गेले आहे.
 
सर्वसामान्य नागरिकांकरिता शासकीय पुढाकारातून ‘नगर सभागृह‘ साकारणार आहे. परिणामी मुंबईकरांना नागरी संवादासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. पर्यटकांसह सर्वांना हा पुरातन वारसा परिसर ‘व्ह्यूईंग गॅलरी’तून विहंगम स्वरुपात न्याहाळता येणार आहे. या गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट असतील. त्याचप्रमाणे छतावर उपाहारगृह होणार आहे.
 
ही संपूर्ण इमारत तळ मजला अधिक पाच मजल्यांची असेल. इमारतीची एकंदरीत रचना या परीसराच्या पुरातन वारशाला साजेशी करण्यात येणार आहे. इमारतीच्या आतमध्ये ‘नगर सभागृह’ असेल. या टाऊनहॉल जिमखाना वास्तूची संकल्पना महानगरपालिका वास्तुशास्त्रज्ञ विभागाने तयार केली आहे.
 
सुसज्ज व अत्याधुनिक महानगरपालिका क्रीडाभवन उभारणार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून ‘टाऊनहॉल जिमखाना‘ उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या टाऊनहॉल जिमखान्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स जवळील तुळशीवाडी येथील जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. याठिकाणी नियोजित क्रीडासुविधांमध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, अत्याधुनिक व्यायाम शाळा तसेच जलतरण तलाव आदी सुविधांचा समावेश असेल.
 
Powered By Sangraha 9.0