मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली येथील रहिवाशी अतुल मोने मृत्यूमुखी पडले. दरम्यान, त्यांची मुलगी ऋचा मोने हिने त्यावेळी तिथे घडलेला भयावह घटनाक्रम सांगितला आहे.
पहलगाम येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ जण मृत्यूमुखी पडले. यात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या तीन मावसभावांचाही मृत्यू झाला. दरम्यान, आता अतुल मोने यांची मुलगी ऋचा हिच्या डोळ्यादेखत तिथे घडलेला थरार सांगितला.
ती म्हणाली की, "आम्ही तिथे बराच वेळ होतो. सगळं व्यवस्थित सुरु होतं. आम्ही तिथून निघत असताना अचानक फायरिंग सुरू झाली. त्यांच्या हातात बंदूक होती आणि ते फायरिंग करत होते. त्यांनी कोण हिंदू आहे आणि कोण मुस्लीम आहे असे विचारले. त्यानंतर संजय काकांनी (संजय लेले) हात वर केल्यावर त्यांना गोळी मारली. हेमंत काका काय झालं हे विचारण्यासाठी गेले असता त्यांनादेखील गोळी मारली. त्यानंतर माझे बाबा तिथे गेले आणि आम्ही काही करत नाही, आम्हाला गोळी मारू नका, असे बोलत होते. तर माझ्यासमोरच त्यांनादेखील गोळी मारली. आम्ही जवळपास १५ ते २० मिनिटे भयभीत स्थितीत होतो. दहशतवादी गेल्यानंतर आम्ही तिथून पळालो. आम्ही बाबांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठत नव्हते."
सरकारकडून आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा!
"आमच्यासाठी हे सगळं खूपच अनपेक्षित होते. आम्ही तिथे फिरायला गेलो आणि आमचा फिरण्याचा पहिलाच दिवस होता. पण असे काहीतरी होईल अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती. आम्हाला वाटलं की, काश्मीर सुरक्षित आहे. याआधीही माझे आईबाबा जम्मू काश्मीरला जाऊन आलेत, असे म्हणत तिने सरकार आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त केली.