मुंबई (Pandit Deendayal Upadhyay): “भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सवा’त ते बोलत होते.
‘लोढा फाऊंडेशन’, ‘एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव समिती’ महाराष्ट्र आणि ‘दीनदयाळ रिसर्च सेंटर’ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळ’ सदस्य मनमोहन वैद्य, भाजपचे राष्ट्रीय सहसंगठनमंत्री शिवप्रकाश, आ. अमित साटम, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, ‘दीनदयाळ रिसर्च सेंटर’चे अतुल जैन, एच. के. जैन उपस्थित होते.
’भूसांस्कृतिक राष्ट्रदर्शन’ या विषयावर पुष्प गुंफताना डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले, “भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. हा एक परिवार आहे. म्हणूनच सात कोटी लोकांना कुंभमेळ्यात स्नान करण्याची प्रेरणा मिळाली. वेगवेगळ्या प्रथा, परंपरा मानणारे लोक कुंभमेळ्यात सहभागी झाले. ना कोणते विवाद, तंटे, ना असभ्यता. या भावनेला जोडून ठेवणार्या व्याख्येचे नाव राष्ट्रवाद आहे. भारतातील मंदिरे राष्ट्रीय एकतेची प्रतीके आहेत. प्रभू श्रीराम उत्तरेपासून दक्षिणेला जोडणारा धागा आहेत.
२ हजार, ४०० वर्षे जुन्या विष्णू पुराणात भारताचे वर्णन केले आहे की, हा देश असा आहे, जेथे देवताही जन्म घेण्यास धन्यता मानतात. पण आपल्याला काय शिकवले जाते? १९४७ साली भारताचा जन्म झाला. भारताचे दोन पैलू आहेत, एक भारत आणि दुसरा वैश्विक विचार. त्यामुळे भारताला स्वस्थ, आनंदित ठेवणे आपले परमकर्तव्य आहे. ’वंदे मातरम्’ सांस्कृतिक राष्ट्रवादाचे दर्शन करून देते. मातृभूमीचा सन्मान करतानाच विश्व कल्याणासाठी झटणे, हा आपला सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.