मुंबई, नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे म्हाडामार्फत दोन हजार ५०० आणि महादुला येथे एनएमआरडीए मार्फत एक हजार २०० घरकुलांच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. या प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता आणि अन्य मागण्यांवर आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
कामठी येथे १६ हजार स्क्वेअर मीटर आणि अतिरिक्त ८ एकर जागेवर, तसेच महादुला येथे ४.२ हेक्टर जागेवर गृहनिर्माण प्रकल्प राबवले जाणार असून, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
बैठकीला राज्यमंत्री पंकज भोयर,आमदार सुधीर मुनगंटीवार व म्हाडा उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती, तर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ . विपिन इटनकर यांनी आभासी सहभाग घेतला. बैठकीत कामठी आणि महादुला येथील गृहनिर्माण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि अंमलबजावणीसाठी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.
“नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि महादुला येथील गृहनिर्माण प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करतील. या प्रकल्पांना गती देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही.” असे सांगत महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हाडा, एनएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनाला प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करण्याचे आणि कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
भव्य गृहनिर्माण प्रकल्प
कामठी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले उभारली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांना परवडणारी घरे उपलब्ध होतील. कामठी हे नागपूर शहरालगतचे महत्त्वाचे उपनगर असून, येथील औद्योगिक आणि व्यावसायिक विकासामुळे घरांची मागणी वाढली आहे. महादुला येथे नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) मार्फत घरकुले बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर
करण्यात आला आहे. हा प्रकल्प स्थानिक नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच परिसराच्या शहरी विकासाला चालना देईल.
प्रकल्पातील सुविधा
कामठी आणि महादुला येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये आधुनिक आणि सर्वसमावेशक सुविधांचा समावेश असेल. यामध्ये खेळाचे मैदान, सुसज्ज ग्रंथालय, बगीचा, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य केंद्र यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रकल्प पर्यावरणस्नेही आणि टिकाऊ बांधकाम पद्धतींना प्राधान्य देतील, ज्यामुळे रहिवाशांना दीर्घकालीन लाभ मिळतील.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
या प्रकल्पांमुळे कामठी आणि महादुला परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. गृहनिर्माण प्रकल्पांमुळे बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच स्थानिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रालाही फायदा होईल. याशिवाय, परवडणारी घरे उपलब्ध झाल्याने रहिवाशांचे राहणीमान सुधारेल आणि परिसराचा शहरी विकासाला हातभार लागेल.