मुंबई(Amrut Bharat Express):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे भारत’, ‘अमृत भारत एक्सप्रेस’ आणि ‘नमो भारत रॅपिड ट्रेन’ला आधुनिक भारतीय रेल्वेची ‘त्रिवेणी’ म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील ‘वंदे भारत’ आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात लवकरच सहरसा-लोकमान्य टिळकदरम्यान पहिली ‘अमृत भारत एक्सप्रेस’ धावणार आहे.
सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणारी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ही देशातील तिसरी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ आहे. पहिल्या दोन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्या दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल आणि मालदा टाऊन ते एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरुदरम्यान चालवल्या जात आहेत. ही ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ताशी 130 किमी वेगाने धावण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. ‘मेड इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत ही आधुनिक ट्रेन चेन्नईतील श्रीपेरांबूर येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे.
प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन टॉकबॅक सिस्टम
या ट्रेनच्या शौचालयांमध्ये ‘इलेक्ट्रो न्यूमॅटिक फ्लशिंग सिस्टम’ बसवण्यात आली आहे, ज्यामुळे शौचालये स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि पाण्याचा वापरही कमी होईल. साबण डिस्पेंसर आणि एरोसोल आधारित अग्निशमन यंत्रणादेखील बसवण्यात आली आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रवासी आणि ट्रेन व्यवस्थापक यांच्यात द्वि-मार्गी संवाद साधण्यासाठी आपत्कालीन टॉकबॅक सिस्टम असते. भारतीय रेल्वेच्या नॉन एसी कोचमध्ये प्रथमच आगशोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे.
‘नमो भारत रॅपिड ट्रेन’
नेमक्या कशा आहेत?
ही एक इंटरसिटी ट्रेन आहे, जी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. जी एका राज्यातील दोन शहरांना जोडते. या ट्रेनने मेट्रो शहरात जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होतील. ‘नमो भारत’ पूर्णपणे वातानुकूलित आहे आणि त्यात एर्गोनॉमिकली डिझाईन केलेल्या सीट्स आहेत. टाईप-सी आणि टाईप-ए चार्जिंग सॉकेट्स आणि उभ्या प्रवाशांसाठी खास हॅण्डलमुळे ते अत्यंत सोयीस्कर बनते. ट्रेनमध्ये व्हॅक्यूम-आधारित मॉड्यूलर टॉयलेट, दिव्यांगांसाठी विशेष टॉयलेट आणि धूळप्रतिरोधकदेखील आहेत. या ट्रेनचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती ’कवच’ सुरक्षाप्रणालीने सुसज्ज आहे. त्यामुळे अपघाताचा धोका शून्य होतो. प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आग शोधणे, दमन यंत्रणा आणि आपत्कालीन टॉकबॅक प्रणाली सुरक्षित प्रवासाची हमी देते. या ट्रेनमध्ये रूट-मॅप इंडिकेटरदेखील आहेत, जे प्रत्येक स्थानकाची माहिती देतील.
अमृत भारत एक्सप्रेस’ नेमक्या कशा आहेत?
या नॉन एसी एक्सप्रेसमध्ये ‘वंदे भारत’सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचे सर्व कोच स्लीपर आणि नॉन एसी अनरिझर्व्ह क्लासचे असतील. या ट्रेनमध्ये विमानाच्या धर्तीवर फोल्डेबल स्नॅक्स टेबल, मोबाईल होल्डर, फोल्डेबल बॉटल होल्डर, रेडियम एलिमिटेड फ्लोअरिंग स्ट्रिप आणि स्प्रिंग बॉडी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होईल.