मुंबई : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान, माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फार जुने नाते असून आम्ही अधूनमधून भेटत असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "आम्ही महायूतीमध्ये आहोत. त्यामुळे एकमेकांना भेटत राहिल्यास त्यात काही नवीन नाही. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फार जुने नाते असून आम्ही अधूनमधून भेटत असतो." तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचेही ते म्हणाले.
हे वाचलंत का? - राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारच्या महत्वपूर्ण सूचना! यापुढे कोणत्याही...
अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीबाबत काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, "अजित पवार आणि शरद पवार साहेबांच्या भेटी या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने होतात. त्यामुळे या भेटींचा राजकीय अर्थ काढू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कुठल्याही पक्षांमध्ये युती होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक नेते येऊ इच्छितात. आजही काही लोकांचा प्रवेश आहे. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सतत चालू राहणार आहे. देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी यांच्या नेतृत्वात महायूती मजबूतीने पुढे जात आहे. त्यामुळे पुढचे राजकारण कोणत्या दिशेने चालले हे इतर पक्षांना समजले आहे," असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.