विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडक कारवाईची घटना अत्यंत खेदजनक : मंत्री मंगल प्रभात लोढा

22 Apr 2025 19:42:10

Mangal Prabhat Lodha 
 
मुंबई : विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडक कारवाईची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंगळवार, २२ एप्रिल रोजी जैन समाजाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
 
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "विलेपार्ले पूर्व येथील १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर नुकतेच महापालिकेच्या कारवाईत पाडण्यात आले. मागील ३५ वर्षे हे मंदिर परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान राहिले असून त्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळण्याच्या दिवशीच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर पाडले. ही घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे."
 
हे वाचलंत का? -  वक्फ कायद्यामुळे कोणाच्याही अधिकारांचे हनन होणार नाही : केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू
 
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मंदिराच्या जागेची पाहणी करून त्याच ठिकाणी लवकरात लवकर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचीही मागणी केली. त्यानंतर मंत्री लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तात्काळ संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. ही बैठक होईपर्यंत प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पराग आळवणी, आमदार मुरजी पटेल आणि जैन समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0