"निवडणुकीसाठी कायदा बदलला"; राहुल गांधी पुन्हा बरळले!

21 Apr 2025 11:05:15
 
rahul gandhi raised issue-of maharashtra assembly elections in usa
 
 
मुंबई : (Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्पष्ट होते.
  
काय म्हणाले राहुल गांधी?
 
बोस्टनमधील विद्यापीठात एका चर्चासत्रात बोलत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील निवडणूक प्रक्रिया गंभीर समस्या असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. यावेळी ते म्हणाले, "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसून आले. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली होती त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असं घडणं केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटं लागतात. जर ही वेळ लक्षात घेतली तर रात्री २ वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असं कुठेही घडल्याचं पाहण्यास मिळालं नाही." असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
 
पुढे राहुल गांधी म्हणाले की "आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं होतं की मतदान प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाणार आहे का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी कायद्यातही बदल केला त्यामुळे तुम्हाला वाटलं, कुणालाही वाटलं तरीही ते मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ काढू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत हे अगदी स्पष्ट झालं आहे" असाही आरोप राहुल गांधींनी केला आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0