मुंबई : राज्यभरात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राज ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला आहे.
योगेश कदम म्हणाले की, "सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला आहे. उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधून झाला की, त्यांना रक्ताची नातीसुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द राजसाहेब ठाकरेंना देखील आहे."
...आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील!
"याशिवाय शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते नारायणजी राणे, स्व. मनोहरजी जोशी, दिवाकरजी रावते, लीलाधर डाके, रामदासभाई कदम आणि एकनाथजी शिंदे यांनासुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको. त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो. जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील," असा सल्ला योगेश कदम यांनी दिला.