मुंबई : राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, मनसेतील दुसऱ्या फळीतील काही नेत्यांचा या यूतीला विरोध असल्याचे दिसते. या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत न जाण्यासाठी पक्षनेतृत्वाला विनवणी केल्याचीही चर्चा आहे.
एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी उबाठा गटाशी यूती करण्याबाबत सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही काही अटी ठेवत मनसेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांकडून पहिल्यांदाच यूतीचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
हे वाचलंत का? - राज-उद्धव एकत्र? : मनसेच्या मंचावर दिसणार उबाठाचे 'युवराज'!
मात्र, दुसरीकडे मनसेतील अनेक दुसऱ्या फळीतील नेत्यांचा या यूतीला विरोध असल्याचे दिसते. भोंग्यांसाठी मनसैनिकांवर दाखल केलेल्या केसेसबद्दल उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला आहे. तर अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे. त्यामुळे या यूतीला मनसेतील काही नेत्यांचा विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे.