राहुल गांधी नेमका कुणाचा अजेंडा चालवतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल

21 Apr 2025 12:52:18
 
Rahul Gandhi Devendra Fadanvis
 
मुंबई : राहुल गांधी सातत्याने विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील तर ते नेमका कोणाचा अजेंडा चालवतात असा संशय निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधींनी विदेशात जाऊन विधानसभा निवडणूकीवरील केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोस्टन येथील ब्राऊन विद्यापीठात भाषण दिले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित करत भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
हे वाचलंत का? -   "अजित पवार आणि शरद पवार एकत्र..."; संजय राऊतांचा दावा
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची आणि भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली. सातत्याने ते अशा प्रकारची बदनामी करत असून हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. वारंवार निवडणूकांमध्ये पराभव झाल्याने त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसत आहे. परंतू, ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील तर ते नेमका कोणाचा अजेंडा चालवतात असा संशय निर्माण होतो."
 
...तरच त्यांची मते वाढतील!
 
"राहुल गांधींनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरुन भारताची बदनामी करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासार्हतना निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. परंतू, ते करण्याऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम ते करतात. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली या सगळ्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. आता मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीवर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. हा अतिशय बाळबोध प्रकार असून राहुल गांधींनी भारताची बदनामी करणे बंद करावे," असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0