पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना १० लाख रुपयांची मागणी केल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकला नाही आणि दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचलंत का? - धनंजय मुंडेंना अर्धांगवायू? बाबासाहेब पाटलांच्या विधानानंतर काय म्हणाले मुंडे?
या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता ससून रुग्णालयाचा अहवाल पुढे आला असून यात तनिषा भिसे यांना १० लाख रुपयांची मागणी करणारे डॉ. सुश्रृत घैसास यांना दोषी ठरवण्यात आले आहे. कलम १०६(१) नुसार त्यांच्या विरोधात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.