मुंबई : विधानसभा निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. दरम्यान, आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, "आमच्यातले वाद, आमच्यातील भांडणे, आमच्यातील गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे या फार कठीण गोष्टी आहेत असे मला वाटत नाही. पण विषय फक्त ईच्छेचा आहे. हा विषय फक्त माझ्या ईच्छेचा आणि स्वार्थाचा नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय पक्षांतील मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पत्र काढावा, असे माझे म्हणणे आहे," असे ते म्हणाले.
समोरच्याची ईच्छा आहे का?
"एकनाथ शिंदेंचे बाहेर जाणे हा एका वेगळ्या राजकारणाचा भाग आहे आणि मी शिवसेनेतून बाहेर पडणे वेगळे आहे. माझ्याकडेसुद्धा आमदार, खासदार सगळे आले होते. पण मी बाळासाहेब सोडून कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही, ही एकच गोष्ट माझ्या मनात होती. शिवसेनेत असताना उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची तशी ईच्छा आहे का? महाराष्ट्राची ईच्छा असेल तर जाऊन तिकडे सांगावे. अशा छोट्या, छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा इगो मध्ये आणत नाही," असेही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.