बांगलादेशात पुन्हा हिंदू नेत्याची हत्या, भारतानं युनुस सरकारला सुनावले खडेबोल!

19 Apr 2025 19:40:09
 
India Slams Bangladesh After Hindu Leader
 
 
नवी दिल्ली : (India Slams Bangladesh After Hindu Leader's Murder) बांगलादेशातील दिनाजपूर येथील एका हिंदू समुदायाच्या नेत्याचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध व्यक्त करत बांगलादेशात युनुस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
 
बांगलादेशातील दिनाजपूर येथे ५८ वर्षीय हिंदू नेते भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. भावेश चंद्र रॉय हे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे एक प्रमुख नेते होते. बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्षपदही भूषविले होते. यावर भारत सरकारने मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचा निषेध केला आहे. सर्व नागरिकांना समान सुरक्षा प्रदान करणे ही त्यांची संवैधानिक आणि नैतिक जबाबदारी आहे, याची आठवण भारताने बांगलादेश सरकारला करून दिली.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी एक्सवर या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक नेते भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण आणि क्रूर हत्या दुर्दैवी आहे. या हत्याकांडामुळे अंतरिम सरकारच्या काळात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या पद्धतशीर छळाची पुनरावृत्ती होत आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कोणत्याही सबबीशिवाय आणि भेदभावाशिवाय हिंदूसह सर्व अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी",असे म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0