नवी दिल्ली : (Dawoodi Bohra Delegation meets PM Modi) सध्या देशात वक्फ सुधारणा कायद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटना या कायद्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दुसरीकडे दाऊदी बोहरा समुदायाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वक्फ दुरुस्ती कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहेत. यावेळी त्यांनीही हेही सांगितले की, ही त्यांच्या समुदायाची दीर्घकाळापासूनची मागणी होती.
दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या दृष्टिकोनावर विश्वास व्यक्त केला. आणि देशात होत असलेल्या सर्वसमावेशक सकारात्मक बदलांचे कौतुकही केले. यावेळी पंतप्रधान मोदींनीही दाऊदी बोहरा समुदायाच्या योगदानाचे कौतुक करुन सरकार प्रत्येक समुदायाच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू देखील उपस्थित होते.
बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा वक्फ कायदा एका रात्रीत बनवण्यात आलेला नाही. वक्फ कायद्यातील बारकावे समजून घेण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. वक्फसंबंधित तक्रारी दाखल करणाऱ्या १,७०० हून अधिक लोकांपैकी बहुतेक मुस्लिम महिला होत्या. वक्फच्या नावाखाली असहाय्य आणि निराधार गरीब लोकांच्या मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा सांगितला जात होता.