नवी दिल्ली : (UNESCO) श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथांना यूनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत (Memory of the World Register) स्थान मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली आहे. या दोन्ही ग्रंथांना हा मान मिळणे हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे वैश्विक मान्यतेचे प्रतिक आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारताच्या संस्कृतीच्या वारशासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये कोरले गेले आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञान आणि कलात्मक प्रतिभेचा गौरव आहे. या कालातीत कलाकृती केवळ साहित्यिक वारसा नव्हे तर भारताच्या सौंदर्यशास्त्र आणि तत्वज्ञानाचा पाया आहे. हे दोन्ही ग्रंथ आपल्या विचार करण्याच्या, अनुभवण्याच्या, जगण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीला आकार देणारे आधारस्तंभ आहेत. यासह, आता या आंतरराष्ट्रीय रजिस्टरमध्ये आपल्या देशातील १४ शिलालेख आहेत.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या पोस्टवर ट्विट करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश करणे ही आपल्या शाश्वत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जागतिक मान्यता आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेचे पोषण केले आहे. त्यांचे अंतर्दृष्टी जगाला प्रेरणा देत राहतात.
UNESCOच्या जागतिक स्मृती नोंदणीत समावेश
श्रीमद् भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या ग्रंथांना युनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत स्थान मिळाले आहे. ही नोंदणी सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि त्यांचे जागतिक स्तरावर संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी केली जाते. ही नोंदणी यूनेस्कोच्या जागतिक स्मृती कार्यक्रमाअंतर्गत झाली, ज्याचे उद्दिष्ट सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे संरक्षण आणि प्रसार करणे आहे. या यादीत आता भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांच्यासह जगभरातील ४३२ दस्तऐवजांचा समावेश झाला आहे, ज्यामध्ये भारताचे योगदान आता अधिक ठळक झाले आहे.