मुंबई : सिंधुदुर्ग येथे प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली असून यात उबाठा गटाचे नेते वैभव नाईक यांचा हात असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी शुक्रवार, १८ एप्रिल रोजी केला.
माध्यमांशी बोलताना निलेश राणे म्हणाले की, "वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी कुठलीही तक्रार दाखल झाली नाही. ९ एप्रिल २०२५ रोजी प्रकाश बिडवलकर यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. वैभव नाईकांच्या म्हणण्याप्रमाणे ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली तर त्यांनी तेव्हाच पोलिसात तक्रार दाखल केली नाही? ९ एप्रिल रोजी बिडवलकर यांच्या नातेवाईंकांनी तक्रार दाखल केल्यानंतर सोमवार, १४ एप्रिल रोजी वैभव नाईकांनी बिडवलकर यांचा व्हिडीओ टाकला. त्यांनी आधी पोलिसांकडे न जाता सोशल मीडियावर पोस्ट टाकली."
हे वाचलंत का? - सध्या काही लोकांना उद्योग राहिले नाही म्हणून...; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला
वैभव नाईक कुणाला घाबरले?
"वैभव नाईक यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दोन वर्षांपूर्वी या घटनेची माहिती होती. तर त्यांनी तेव्हाच पोलिसांना का सांगितले नाही? त्यावेळी वैभव नाईक आमदार असतानाही कुणाला घाबरत होते? सिद्धेश शिरसाट तुम्हाला गप्प बसण्याचे पैसे द्यायचा का? वैभव नाईक सातत्याने काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो व्हिडीओ २०१९ चा आहे आणि २०२३ ला जर बिडवलकर गेला असेल तर त्याबद्दल एसपींनी चौकशी करावी. वैभव नाईक यांनी माहिती लपवल्याबद्दल पोलिसांनी आधी त्यांनाच उचलले पाहिजे. वैभव नाईकांना बॉडी कुठे आहे ते माहिती आहे," असेही निलेश राणे यांनी सांगितले.