शेअर बाजाराची धडाकेबाज कामगिरी सुरुच, १५०० अंशांची उसळी

17 Apr 2025 19:12:58
nifty
 
 
 
मुंबई : भारतीय शेअर बाजाराची जोरदार कामगिरीचा सिलसिला गुरुवारीही कायम राहीला. गुरुवारी तब्बल १५०८ अंशांची उसळी घेत शेअर बाजाराने ७८,५५३ अंशांचा पल्ला गाठला. या धडाकेबाज कामगिरीमुळे गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. निफ्टीनेही ४१४ अंशांची जोरदार उसळी घेत निर्देशांक २३,८५१ अंशांवर बंद झाला. सर्वच आशियाई बाजारांमध्ये जोरदार उसळी बघायला मिळाली. जपान, हाँगकाँग या महत्वाच्या देशांतील शेअर बाजारांमध्ये शेअर्समध्ये वाढच बघायला मिळाली. एकूणच गुरुवारचा दिवस हा सर्वच ठिकाणी गुंतवणुकदारांसाठी आनंदाचा दिवस ठरला.
 
प्रामुख्याने वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स झेपावताना दिसले. या वाढ झालेल्या शेअर्समध्ये इटर्नल, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, सन फार्मा या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स होते. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा यांच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ झाली. गेले चार सत्र भारतीय शेअर बाजारात वाढच दिसून येत आहे. ही गुंतवणुकदारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.
 
शेअर बाजारातील या जोरदार कामगिरीमागे बँकांनी घटवलेले व्याजदर कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दरांत कपात केल्याने बँकांनीही कर्जांवरचे आपले व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे कर्जदारांमध्ये वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर, अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या आयातशुल्कातून दिलासा मिळण्यासाठी भारत सरकारने द्विपक्षीय करारासाठी चालवलेली बोलणी यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. या सर्व कारणांमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यामुळे गुंतवणुकदार उत्साहाने गुंतवणुक करत आहेत. ही सर्व निरिक्षणे तज्ज्ञांनी नोंदवली आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0