भारतीय संस्कृती जगाच्या मार्गदर्शनाचे केंद्रबिंदू बनली आहे : सरसंघचालक

17 Apr 2025 15:57:08

Sarsanghachalak meeting with Swayamsevak

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sarsanghachalak Kanpur)
"भारतीय संस्कृती जगाच्या मार्गदर्शनाचे केंद्रबिंदू बनली आहे. भारत हा जागतिक नेता राहिला आहे आणि आज पुन्हा जगातील लोक भारताच्या चालीरीती, तत्त्वे, परंपरा आणि संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. कानपूर येथे कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीतील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय संस्कृतीचे महत्त्व, कौटुंबिक जवळीक आणि पर्यावरण संरक्षण यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले.

कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या कार्यकर्त्यांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, कुटुंब प्रबोधनाचे कार्य भजन, भोजन, भवन, भाषा, भूषा आणि भ्रमण या सहा मुद्द्यांमध्ये करावे. कौटुंबिक जिव्हाळ्याची परंपरा कायम राहिली पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनी दिवसातून एकदा एकत्र जेवण केले पाहिजे, कुटुंबात बोलताना मातृभाषेचा वापर केला पाहिजे, आपल्या कपड्यांमध्ये आपली संस्कृती दिसून आली पाहिजे, आपले घर असे असावे की ते आदर्श हिंदू घर आहे असे वाटले पाहिजे. संघ स्वयंसेवक हे विषय घेऊन समाजात पुढे जात असतात. आज समाजाला या विषयांची माहिती आणि जनजागृतीची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांप्रती जबाबदारीची भावना असली पाहिजे. हळूहळू हा विषय समाजात रुजायला हवा आणि आदर्श कुटुंबाची संकल्पना प्रत्यक्षात यायला हवी.

देशभक्तीचे महत्त्व सांगताना सरसंघचालक म्हणाले, 'देशभक्तीची भावना आपल्या दैनंदिन जीवनात यायला हवी. हा माझा देश आहे ही भावना समाजात निर्माण झाली पाहिजे. जेव्हा आपल्याला आपल्या देशाबद्दल आपलेपणाची भावना असेल, राष्ट्राची भावना प्रथम येईल, तेव्हा आपण अगदी लहान गोष्टींचा विचार करू. समाजात हळूहळू बदल होत आहेत, पण अजून गरज आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांनी स्वत:साठी आणि समाजासाठी प्रेरणास्थान बनले पाहिजे. जर राष्ट्राची कल्पना प्रथम समाजात रुजली तर हे सर्व नैसर्गिक होईल, हेच आपल्याला करायचे आहे.

Powered By Sangraha 9.0