बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका
17 Apr 2025 14:57:47
Mithun Chakraborty Comment on Mamata Banerjee
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिथून चक्रवर्ती म्हणाले की, पश्चिम बंगालमधील हिंदूंवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांबाबत पश्चिम बंगालमध्ये हिंदू बेघर झाले आहेत. त्यांना रिलीफ कॅम्पमध्ये राहावे लागतेय. शेवटी त्यांचा काय दोष? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या राजकारणासाठी जातीय तेढ पसरवून दोन समुदायांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्या मुद्दाम मुस्लीम समाजातील लोकांना गोंधळात टाकून भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढे बोलताना मिथून चक्रवर्ती यांनी वक्फ कायद्याच्या विरोधात केलेल्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारतीय संसदेने मंजूर केलेला कायदा लागू न करण्याचा अधिकार ममता बॅनर्जींना कोणी दिला असा सवाल केलाय. त्या संविधानाहून वरचढ झाल्या आहेत का? त्यामुळे येत्या निवडणुकीत हिंदूंनी १०० टक्के मतदान केले नाही तर भविष्यात त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागेल.