मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांनी दुसऱ्यांच्या पक्षावर बोलण्यापेक्षा आपला पक्ष सांभाळावा, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी केली.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "हर्षवर्धन सपकाळ यांची बोलण्याची उंची नाही. रेशीमबागेचा उल्लेख करताना किंवा संघाबद्दल बोलताना उंची बघून बोलले पाहिजे. त्यांच्या तोंडातून रेशीमबागेचा उल्लेख निघणे योग्य नाही. ते सध्या माध्यमांच्या झोतात येण्यासाठी असे शब्दप्रयोग करतात. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या बरोबरीत येण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांनी काँग्रेस पक्षातील वेगवेगळ्या तोंडाना एकत्र आणले तरी भरपूर आहे. त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षावर बोलण्यापेक्षा आपला पक्ष सांभाळावा," असा सल्ला त्यांनी दिला.
हे वाचलंत का? - उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
काँग्रेसचा बुरखा फाडणार
"नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून त्यात गांधी परिवार अडकला आहे. आरोपपत्रातील विषय बाहेर आल्यानंतर गांधी परिवाराचा चेहरा उघडा पडणार आहे. तसे होऊ नये म्हणून काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. नॅशनल हेराल्डशी त्यांचा कसा कसा संबंध आहे हे आम्ही जनतेसमोर मांडणार असून काँग्रेसचा बुरखा फाडणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष घाबरून आंदोलन करत आहेत," असेही ते म्हणाले.