मराठी बोलण्यास बंदी केल्यास शाळांवर बडगा

16 Apr 2025 16:06:39

marathi in school
 
ठाणे: ( marathi in school ) ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. शिक्षण विभागाने या तक्रारींची तत्काळ दखल घेत, विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलण्यास सक्ती केल्यास कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
 
इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर मराठी भाषेचा वापर न करण्यासाठी दबाव टाकला जातो. काही ‘सीबीएसई’ व ‘आयसीएसई’ माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीत बोलल्यास विद्यार्थ्यांना अपमानित केले जात असल्याबाबत तक्रारी आल्या होत्या.
‘मनविसे’चे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी शिष्टमंडळासह नुकतीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी अधिकृत आदेश काढला.
 
या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मराठीतून संवाद साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. फक्त मराठी विषयापुरते भाषेचे शिक्षण न देता, इतर सर्व उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांनी मराठीचा वापर करावा, असे आदेशात नमूद आहे.
 
शिक्षण विभागाच्या परिपत्रकानंतर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मराठी भाषेचा आदर ठेवत शाळेतील संवादात तिचा समावेश करणे बंधनकारक असेल. हा निर्णय केवळ तक्रारीपुरता मर्यादित न राहता, राज्यभरात मातृभाषेला स्थान देण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरत आहे. शिक्षण क्षेत्रातील भाषिक असंतुलन रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पाचंगे यांनी व्यक्त केला.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0