पुणे : महिलांच्या न्यायासाठी राज्य सरकारने महिला आयोग आपल्या दारी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. मंगळवार, १५ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली.
या जनसुनावणी बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीयुत गिरासे उपस्थित होते.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आयोगाचे मुख्यालय मुंबईत असले तरी प्रत्येक महिलेला तिकडे पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक महिलेला तिच्या दारी न्याय मिळायला हवा या उद्देशाने आयोग स्वतः प्रत्येक जिल्ह्यांमध्ये येत आहे. मंगळवारी पुण्यातून या उपक्रमाला सुरुवात झाली असून महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी महिलांनी आपले प्रश्न, तक्रारी ठामपणे मांडल्या. या जनसुनावणीत १२३ तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. प्रामुख्याने कौटुंबिक छळ, मालमत्ता आणि इतर गंभीर विषयांशी संबंधित या तक्रारी होत्या. तसेच यावेळी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्वे (SOP) असाव्या अशी भूमिका आयोगाने मांडली.
पुढील जनसुनावण्या कधी?
दिनांक १६ एप्रिल रोजी पुणे ग्रामीण भागातील जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या १७ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवडमध्ये ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.