ममता बॅनर्जी आधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

    13-Apr-2025
Total Views |

ममता बॅनर्जी
 
कोलकाता : "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे.
 
या हिंसक परिस्थितीत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमध्ये तिघेजण हिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित मृत्युमुखी असणारा युवक आणि त्याचे वडील हे धुलियानस्थित होते. हिंसक जमावाने हरगोबिंद दास (वडील)आणि चंदन दास (मुलगा) अशी मृतकांची नावे आहेत. याच हिंसक परिस्थितीत सुमारे १५ पोलीस जखमी असल्याचे वृत्त आहे. अनेक दुकानांना आग लावण्यात आली आणि घरांची तोडफोड करत लुटमार करण्यात आली. वक्फ सुधारित विधेयकाच्या निषेधार्थ राज्यात १० एप्रिलपासून हिंसाचाराचे सत्र कायम आहे. त्याचाच विपरीत परिणाम हा पश्चिम बंगालवर झाला आहे.
 
 
 
 
केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त भागात १६०० केंद्रीय दलाचे जवान तैनात केले आहेत. शिवाय, सुमारे ३०० बीएएसएफ सैनिकांचा फौजफाटा मुर्शिदाबादमध्ये दाखल करण्यात आला आहे. अनेक वाहनांना आग लावण्यात आली असून हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. हिंसाचार घडलेल्या भागात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच हिंसाचारात आतापर्यंत तब्बल १५० निदर्शकांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, अद्यापही परिस्थिती 'जैसे थे' अशीच आहे.
 
यामुळे आता भाजप नेते तरुण चुघ यांनी ममता बॅनर्जी यांना या हिंसाचार प्रकरणी कारणीभूत ठरवले आहे. त्यांना अधुनिक जिना म्हणून फटकारले आणि त्यांचा पक्ष हा मुस्लिम लीगसारखे काम करत असल्याचा तिखट दावा त्यांनी केला. वक्फ बोर्डाच्या विरोधात निदर्शनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेवर ममता बॅनर्जीं मूग गिळून गप्प बसल्या आहेत. त्यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे. ममता सरकार हे मतांच्या तुष्टीकरणाच्या नावाखाली हिंदूंना लक्ष्य करत आहेत, असा आरोप तरुण चुघ यांनी केले आहे.