राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. स्थापनेपासून या संघटनेने सातत्याने विस्तार, संघटनात्मक बळकटी करून आपला प्रभाव वाढवला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संघकार्यांबद्दल जाणून, समजून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरोखर समजून घेण्यासाठी, त्याचे संस्थापक, प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना समजून घेणे क्रमप्राप्त आहे. डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त, ते जुलमी ब्रिटिश राजवटीला घालवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या संघर्षमय जीवनकार्यावरून याची कल्पना आपल्या येते.
डॉक्टरांचा असा दृढ विश्वास होता की, केवळ स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हे रोगाच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, त्याच्या केवळ लक्षणांवर उपचार करण्यासारखे आहे. त्यांनी असे नमूद केले आहे की, “विशाल, समृद्ध भारतीय समाजाला वश करण्यास कारणीभूत असलेली मूळ कारणे शोधून आत्मपरीक्षण करणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या मूलभूत समस्यांवर उपाय म्हणून, त्यांनी समाजात आत्माभिमान, स्वाभिमान, एकता, बंधुत्व, शिस्त, राष्ट्रीय चारित्र्याची भावना समाजात वाढवण्यासाठी, प्रयत्न सुरू केले. स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये, हेडगेवार सक्रिय सहभाग घेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ऑक्टोबर 1925 साली विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
भारताची सामूहिक ओळख अध्यात्मावर, अविभाज्य आणि समग्र जागतिक दृष्टिकोनावर आधारलेली आहे; ज्याला ‘हिंदुत्व’ किंवा ‘जीवनाकडे पाहण्याचा हिंदू दृष्टिकोन’ म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. या नीतिमत्तेचे पुनरुज्जीवन करणे, संपूर्ण समाजाचे एकत्रीकरण करणे, सकल हिंदू समुदायासाठी सतत कार्यरत राहणे, या उद्देशाने संघाने आपले कार्य सुरू केले. डॉ. हेडगेवार यांचे त्यांच्या काळातील आघाडीच्या विचारवंत आणि बुद्धिजीवींशी, जवळचे संबंध होते. तरी त्यांची दृष्टी, इतर विचारवंतांच्या तुलनेने व्यापक, समावेशी होती.
डॉ. हेडगेवार यांचा दृष्टिकोन व्यापक, दूरदृष्टीचा होता, जो त्यांना त्यांच्या समकालिनांपेक्षा वेगळे ठरवतो. या काळात अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक संघटना उदयास आल्या, ज्यांनी भारताच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघाची स्थापना पूर्णपणे या मोठ्या चळवळीशी सुसंगत होती. तथापि, स्थापनेपासूनच हे स्पष्ट होते की संघ केवळ समाजात एक छोटे संघटन म्हणून काम करणार नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाचे मूर्त स्वरूप म्हणून काम करेल. एका प्रतिष्ठित विचारवंताने हुशारीने निरीक्षण नोंदवले आहे की, संकल्पनात्मक, मानसिकदृष्ट्या संघ आणि हिंदू समाज एकत्रित आहेत. सहजीवन, ऐक्याच्या धोरणावर संघ अविरत कार्यरत आहे.
सामाजिक जबाबदारी आणि सहभाग
डॉ. हेडगेवार वादविवाद आणि विरोधी भूमिका टाळून, समाजाला एकत्रित करण्यासाठी वचनबद्ध होते, ‘वदोनवलंब्य’ (वादविवादात सहभागी होऊ नका) आणि ‘सर्वेशम अविरोधन’ (कोणालाही विरोध करू नका) या तत्त्वांचे पालन करीत होते. सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या भावनेला बळकटी देत म्हटले की, “इतरांचा आपल्याला कितीही विरोध असला, तरी आम्ही कोणाशीही द्वेष बाळगत नाही. आम्ही त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधू. तसेच, आमची संघटना त्यांच्या विरोधापासून सुरक्षित राहील, याची सुनिश्चितता करू.”
चारित्र्य निर्माण आणि सकल हिंदू समाजाचे संघटन, हे समकालीन आव्हानांशी संबंधित क्रियाकलापांसह संघाच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहे. डॉ. हेडगेवार यांनी शाश्वत आणि क्षणभंगुर या संतुलनाचे उदाहरण दिले. 1925 साली संघाची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी, 1921 सालच्या ‘असहकार चळवळी’त भाग घेतला आणि एक वर्ष तुरुंगवासही भोगला. संघाची स्थापना केल्यानंतर ते आणि इतर स्वयंसेवक, 1930 सालच्या ‘सविनय कायदेभंग चळवळी’त सामील झाले. यामुळे त्यांना आणखी नऊ महिने तुरुंगवास भोगावा लागला.
स्वातंत्र्य चळवळींमध्ये इतका सहभाग असूनही, डॉक्टरांनी त्यांचे सहकारी डॉ. लक्ष्मण वसंतराव परांजपे यांच्यावर सरसंघचालक म्हणून नेतृत्वाची जबाबदारी सोपवून, संघाचे पायाभूत ध्येय सातत्याने सुनिश्चित केले. म्हणूनच शाश्वत आणि क्षणभंगुर यांच्यात फरक करण्याची, डॉक्टरांची अफाट क्षमता संघासाठी आजही तितकीच मार्गदर्शक आहे.
गुरूदक्षिणेची परंपरा
समाजहितासाठी समाजाकडून देणगी स्वीकारण्याची परंपरा, भारतात तशी खूप जुनी. तथापि, डॉ. हेडगेवार यांनी एक नवीन आदर्श प्रस्तुत केला. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी, केवळ स्वयंसेवकांनी दिलेल्या गुरूदक्षिणेतूनच निधी दिला जाईल. ज्यामुळे संघटनेचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वायत्तता सुनिश्चित होईल. संघ स्थापनेपासूनच हा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन सातत्याने पाळला जात आहे.
भारतात अपवादात्मक व्यक्तींना, अनेकदा गुरू म्हणून पूज्य मानले जाते. संघ ही संपूर्ण हिंदू समाजाची संघटना असल्याने, ती कोणत्याही व्यक्तीला गुरू म्हणून स्वीकारण्याची कल्पना टाळते. हिंदू परंपरेत रुजलेल्या एकात्मिक प्रतीकाची गरज समजून, डॉ. हेडगेवार यांनी भगव्या ध्वजाला संघाचा गुरू म्हणून शिरोधार्य केले, जो हिंदुत्वाचा कालातीत वारशाचे मूर्त रूप आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांनी, 1906 साली स्वतंत्र भारतासाठी सर्वांत जुन्या ध्वजांपैकी असलेल्या एकाची रचना केली. यामध्ये भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या वज्र चिन्हाचा समावेश होता. 1931 साली काँग्रेस कार्यकारिणीने जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मास्टर तारा सिंग, मौलाना अबुल कलाम आझाद, पट्टाभी सीतारामय्या (संयोजक), काका कालेलकर आणि डॉ. हर्डीकर यांचा समावेश असलेली एक ‘ध्वज समिती’ स्थापन केली. या समितीने एकमताने असा प्रस्ताव मांडला की, भारताचा राष्ट्रीय ध्वज एकाच रंगाचा असावा, विशेषतः भगवा. कारण, तो सर्व लोकांना समानपणे स्वीकार्य आहे, जो दीर्घ परंपरेने या चिरंजीव देशाशी जोडलेला आहे. समितीच्या डिझाईनमध्ये, आयताकृती भगव्या ध्वजावर कोरलेला निळा चरखा होता. या काळात ‘आर्य समाज’ आणि ‘हिंदू महासभे’सारख्या अनेक संघटनांनी, सूर्य किंवा ओमच्या चिन्हांसह भगवे ध्वज स्वीकारले. तथापि, 1927 साली ‘सकल हिंदू समाजा’चे प्रतीक म्हणून स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या ध्वजावर कोणतेही प्रतीक नाही. यामुळे संघ हे एका विशिष्ट समाजाचे संघटन नसून, संपूर्ण समाजाचे संघटन आहे, हे ध्वनित होते.
शाखेची संकल्पना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रीय चारित्र्य निर्माण, सामूहिक सद्गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच भारतीय समाजाच्या आदर्शांच्या स्मृतींना कायम ठेवण्यासाठी ‘शाखा’ ही पद्धत विकसित केली. सामान्यतः, शाखा एक तास चालते. यामध्ये संपूर्ण भारतीय समाज एकसंध आणि एकसमान असून, तो माझा आहे ही राष्ट्रभावना जोपासली जाते.
उद्योजकता, धैर्य, चिकाटी, शक्ती, बुद्धिमत्ता आणि शौर्य, यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाखेदरम्यान खेळ, लाठी, योगासन, स्वदेशी मार्शल आर्ट, नियुद्धसारखे विविध उपक्रम आयोजित केले जातात. याव्यतिरिक्त संचलन आणि शारीरिक प्रशिक्षण यांसारखे कार्यक्रमदेखील, एकता आणि सामूहिकता, समरसता निर्माण करण्यासाठी आयोजित केले जातात.
त्याच्या मुळाशी शाखा हे केवळ एक नियमित एकत्रीकरण नसून, एक परिवर्तनकारी कार्यपद्धती आहे, जी वैयक्तिक सद्गुण आणि सामूहिक जाणिवेला प्रोत्साहन देते. या तल्लीन वातावरणातून स्वयंसेवकांमध्ये खोलवर रुजलेली आपलेपणाची भावना, राष्ट्राच्या कल्याणासाठी आजीवन वचनबद्धता विकसित होते. या ध्येयाला वचनबद्धतेचा मार्ग म्हणून स्वीकारलेल्या समर्पित कार्यकर्त्यांपासून प्रेरित होऊन, हजारो स्वयंसेवक या निःस्वार्थ भावनेने राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभागी होतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण भारतात व्यापक उपस्थिती निर्माण केली आहे. देशातील 924 जिल्ह्यांपैकी 98.3 टक्के, 6 हजार, 618 ब्लॉक (तहसील) पैकी 92.3 टक्के आणि 58 हजार, 939 मंडलांपैकी 52.2 टक्के (एक मंडल म्हणजे 10-12 गावांचा समूह)पर्यंत संघकार्य पोहोचले आहे.
51 हजार, 710 ठिकाणी 83 हजार, 129 (दैनिक शाखा) आणि अतिरिक्त ठिकाणी 22 हजार, 866 साप्ताहिक मिलन यांच्या विस्तृत कार्यक्षेत्राद्वारे, संघ सातत्याने विस्तारत आहे. यातून संघाचा कायमस्वरूपी प्रभाव आणि आकर्षण अधोरेखित होते.
शाखारचनेचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, त्याची लोकसंख्याशास्त्रीय रचना. 59 टक्के दैनिक शाखांमध्ये विद्यार्थी सदस्य आहेत, तर उर्वरित 41 टक्के व्यावसायिक स्वयंसेवक आहेत. 11 टक्के शाखा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखाली आहेत, तर उर्वरित शाखा तरुण व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली आहेत.
संघ प्रामुख्याने पुरुषांसाठी शाखा आयोजित करतो, तर ‘राष्ट्र सेविका समिती’ केवळ महिलांसाठी शाखा चालवते. यामध्ये चारित्र्य निर्माणाच्या समान प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले जाते. याव्यतिरिक्त प्रचार विभाग, संपर्क विभाग आणि सेवा विभाग याद्वारे, संघ स्वयंसेवकांनी हाती घेतलेल्या विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये महिला सक्रियपणे सहभागी होतात. या प्रयत्नांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, सतत प्रयत्न केले जातात.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारे उपक्रम
शाखांव्यतिरिक्त संघ मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी, विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आपला सक्रिय सहयोगी सहभाग नोंदवतो. हे प्रयत्न धर्मजागरण समन्वय, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, गौ संवर्धन, पर्यावरण संरक्षण, घुमंतू कार्य आणि सामाजिक सद्भाव कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेले आहे. या सर्व सामाजिक परिवर्तनात्मक उपक्रमांमध्ये, स्वयंसेवकांसह महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढत आहे.
सामाजिक जीवनाच्या विविध पैलूंमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, संघ स्वयंसेवक कामगार, शेती, विद्यार्थी कल्याण, शिक्षण, धार्मिक नेतृत्व, राजकारण, कला, कायदा, लघुउद्योग, जनजातीय कल्याण, क्रीडा आदि 35 हून अधिक क्षेत्रांमध्ये, सक्रिय कार्यरत आहेत. या उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, एकत्रित प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे, स्वयंसेवक ज्या उपक्रमांमध्ये सहभागी आहेत, ते सर्व उपक्रम स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे चालतात, जे संघाच्या मार्गदर्शक तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहेत. बाह्य संरचनांवर अवलंबून राहण्याऐवजी, अंतर्गत समाज संघटन करणे हे संघाचे उद्दिष्ट आहे.
संघाची व्याप्ती आणि प्रभाव
संघाचा शताब्दीचा प्रवास, सतत विस्तार आणि अढळ दृढनिश्चयाचा राहिला आहे. प्रारंभी संघटनेला उदासीनता, उपहास, प्रतिकार आणि विरोध सहन करावा लागला. तरीही संघ अथक परिश्रम, समर्पण, कार्यकर्त्यांचे बलिदान, समाजाचा अढळ पाठिंबा आणि दैवी आशीर्वाद याद्वारे राष्ट्राचे पुनरोत्थान करण्याच्या आपल्या ध्येयमार्गावर टिकून राहिला आहे. सध्या, समाजाकडून पाठिंबा आणि सहभाग सतत वाढत आहे.
2025 सालच्या विजयादशमीला संघ आपल्या प्रवासाची आणि ध्येयाची 100 वर्षे पूर्ण करेल. त्यानिमित्ताने संघाचे उद्दिष्ट आपल्या कार्यवाढीला गती देणे, संघकार्याचा विस्तार करणे, अधिकाधिक नागरिकांना थेट संघाशी जोडणे आणि राष्ट्रनिर्माणाच्या ध्येयात सहभागी होण्याची संधी देणे असे आहे. या टप्प्याचे अनुसरण करून स्वयंसेवक ‘पंच परिवर्तन’ म्हणून ओळखल्या जाणार्या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये समाजातील अधिकाधिक घटकांना सहभागी करून, समाजात परिवर्तन घडवून आणण्यात सक्रियपणे सहभागी होत आहे.
कुटुंब प्रबोधन : मूल्ये आणि जागरूकता, याद्वारे कौटुंबिक संबंध मजबूत करणे.
सामाजिक समरसता : सामाजिक एकोपा आणि एकात्मता वाढवणे.
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वतता.
स्वदेशी जीवनशैली : स्वदेशी, स्वावलंबी जीवनशैलीचा प्रचार.
लोककर्तव्य बोध : समाज आणि कर्तव्यांप्रति जबाबदारीची भावना जोपासणे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार
संघाच्या उल्लेखनीय वाढीने लोकांना आश्चर्यचकित केले आहे, त्याचे कौतुक केले आहे. या कामगिरीचे श्रेय, संघटनेचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जाते. ज्यांची दूरदृष्टी, नेतृत्व आणि तळागाळातील संघटनात्मक पद्धतींनी, चळवळीच्या शाश्वत प्रभावासाठी एक मजबूत पाया घातला. राजकीय प्रभावावर अवलंबून असलेल्या अनेक चळवळींपेक्षा, संघाने नेहमीच आपल्या परिवारातील संस्थांद्वारे, सामाजिक परिवर्तनावर भर दिला आहे. यामुळे दूरगामी चिरस्थायी प्रभाव सुनिश्चित होतो.
संघगीतातील एक श्लोक या भावनेला संक्षिप्तपणे व्यक्त करतो -
परिवर्तनासाठी केवळ सत्तेवर
अवलंबून राहू नका
जागृत जनतेतून एक स्वावलंबी
समाज उदयास येईल.
वरील उपक्रमांचे अध्ययन, निरीक्षण करताना आणि त्यात सहभागी होताना, एक महत्त्वाचा विचार मान्य करणे अत्यावश्यक आहे, तो म्हणजे शाखांच्या व्याप्तीचा केवळ विस्तार करणे, संपूर्ण समाजाला जागृत करण्यासाठी, मूल्ये जोपासण्यासाठी, संघटित करण्यासाठी पुरेसे नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कुटुंबे, शाळा, महाविद्यालये आणि सामुदायिक संघटनांसारख्या समाजातील संस्थांचा वापर करून मूल्ये प्रदान करणे,जबाबदारीची भावना निर्माण करणे आवश्यक आहे.
जेव्हा प्रत्येक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात अनुकरणीय आदर्श दिसून येतील, तेव्हा समाजाच्या सर्व घटकांमधील व्यक्ती, मुले, तरुण आणि प्रौढांसह या प्राचीन आणि वैभवशाली राष्ट्राच्या प्रामाणिक संकल्पनेची सखोल समज अधोरेखित, विकसित करतील.तरच, संपूर्ण समाजात एक परिवर्तनकारी, सकारात्मक शक्ती उदयास येईल, जी एक आदर्श बदल घडवून आणू शकेल.
शेवटी एक समृद्ध, सक्षम आणि प्रगतिशील भारत आपली समावेशक, एकात्मिक आणि समग्र सांस्कृतिक ओळख स्थापित करेल, जी मानवतेचे मार्गदर्शन करणारी आणि तिच्या जागतिक जबाबदार्या पूर्ण करणार्या दिव्यासारखी असेल. संघाने आपल्या शाखांद्वारे आणि स्वयंसेवकांनी त्यांच्या आचरणाद्वारे केलेले प्रयत्न, समाजाच्या संस्थांमध्ये झिरपू लागतील. एक विजयी, संघटित समाज उदयास येत राहील, संघाचे ध्येय टिकून राहील, जे संपूर्ण समाजाच्या उन्नतीचा अविभाज्य भाग होईल.
डॉ. मनमोहन वैद्य
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.)