"शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका तर..."; गृहमंत्री अमित शाह यांचे रायगडावरून आवाहन

    12-Apr-2025
Total Views |
 
Amit Shah
 
रायगड : छत्रपती शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. तर देश आणि जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "जिजाऊंनी छत्रपतींना केवळ जन्मच दिला नाही तर त्यांना स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा उद्धार करण्याची प्रेरणासुद्धा दिली. बाल शिवरायांना देशाला स्वतंत्र करण्याचा विचार आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक करण्याचा विचारही जिजाऊंनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाला अभिवादन करतानाचे माझ्या मनातील भाव मी वर्णन करू शकत नाही. शिवरायांनी हिंदुस्तानातील कणकणात स्वधर्मासाठी, स्वभाषेसाठी आणि स्वराज्यासाठी मरण्याची एक जिद्द निर्माण केली. पाहता पाहता चारही बाजूंनी आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाहीने घेरला गेलेला हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलला. त्यानंतर काही वर्षांतच अटकपासून कटकपर्यंत, बंगालपर्यंत आणि दक्षिणेत तामिळनाडू, गुजरातसह संपूर्ण देशाला स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत होते. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा देशातील जनता घोर अंधकारात होती. कुणाच्याही मनात स्वराज्याची कल्पनाही येणेही मुश्किल होते. १०० वर्षांच्या आत दक्षिणेचंही पतन झालं. पण हळूहळू स्वधर्म आणि स्वराज्य म्हणजे लोकांना गुन्हा वाटू लागला."
 
हे वाचलंत का? -  ...म्हणूनच छत्रपती शिवराय आमचे दैवत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
 
"परंतू, एका १२ वर्षाचा मुलाने सिंधूपासून तर कन्याकुमारीपर्यंत पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची शपथ घेतली. मी आजपर्यंत अनेकांचे जीवनचरित्र वाचले पण अशी दृढ ईच्छाशक्ती, शौर्य, अकल्पनीय रणनीती आणि ती पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व समाजातील सर्व वर्गातील लोकांना एकत्र करून एक अपराजित सेना निर्माण करण्याचे काम छत्रपतींशिवाय दुसऱ्या कुणीही केले नाही. त्यांनी आपल्या शौर्य आणि संकल्पाने २०० वर्षांपासून सुरु असलेली मुघलशाही नष्ट केली," असे त्यांनी सांगितले.
 
आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रात पराजित झाला
 
ते पुढे म्हणाले की, "आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर आपण जगासमोर मान वर करून उभे आहोत. स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल आणि याची मूळ कल्पना शिवरायांनी आणली. जिजाऊंनी बाल शिवरायांवर संस्कार केले आणि शिवरायांनी त्या संस्कारांना वटवृक्ष बनवले. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी हे सगळे औरंगजेब जिवंत असेपर्यंत त्याच्याशी लढत राहिले. स्वत:ला आलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला. महाराष्ट्रात त्याची समाधी आहे. भारतातील प्रत्येक मुलाला शिवचरित्र शिकवले पाहिजे. शिवरायांना केवळ महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका. देश आणि जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे," असे आवाहनही अमित शाह यांनी केले.