नवी दिल्ली : (Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली आहे.
एनआयए मुख्यालयात एक चौकशी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात फक्त १२ सदस्यांना प्रवेश असणार आहे. यामध्ये डीजी एनआयए सदानंद दाते, आपजी आशिष बत्रा, डीआयजी जया रॉय अश्या एसपी आणि डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही चौकशी एनआयए चौकशी कक्षात सीसीटीव्हीसमोर होईल, ज्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग केले जाईल.राणाच्या कोठडीदरम्यान एनआयए दररोज चौकशी डायरी तयार करेल. चौकशीच्या अंतिम फेरीनंतर, त्याचे खुलासा विधान नोंदवले जाईल. जे केस डायरीचा भाग आहे. बीएसएनमध्ये अशी तरतूद आहे की, आरोपीची दर ४८ तासांनी वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. चौकशी टाळण्यासाठी राणा कोठडीत स्वतःला इजा पोहोचवू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाईल.
एनआयए मुख्यालयातील सुरक्षेत वाढ
तहव्वूर राणा सध्या चौकशीसाठी एनआयए मुख्यालयात कोठडीत आहे, त्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएने त्याला १८ दिवसांसाठी ताब्यात घेतले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. अतिरिक्त पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\