"माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण..."; सुप्रियाताईंच्या उपोषणावर काय म्हणाले अजितदादा?
11-Apr-2025
Total Views |
मुंबई : बनेश्वरच्या रस्त्याचे काम करण्याच्या मागणीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण केले होते. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बनेश्वर रस्त्याच्या कामासाठी योग्य तो निधी देणार असून माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करावे लागणार नाही, असे ते म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याच्या कामासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तो रस्ता खासदार निधीतूनही करता येऊ शकतो, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर ५ कोटींच्या निधीत किती काम होणार, असा सवाल करत खासदार निधी कमी पडत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, आता बनेश्वर येथील रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. बनेश्वरच्या ६०० मीटरच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करा. आता पुन्हा माझ्या बहिणीला आणि इतर कोणत्याही नागरिकाला उपोषणाची वेळ येऊ नये.या रस्त्यासाठी आवश्यक तो सगळा निधी देण्याच्या सूचना दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पालकमंत्रीपदासाठी थोडा धीर धरा
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर बोलताना ते म्हणाले की, "नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नसला तरी काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून जिल्हा नियोजनासाठीचा निधी दिलेला आहे. त्यामुळे थोडासा धीर धरा," असे ते म्हणाले.