वॅाश्गिंटन डी सी : (Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.
स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी ३:१७ वाजता (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) घडली. होबोकेनमधील पियर ए पार्क येथे न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ हडसन नदीत हेलिकॉप्टर अपघात झाल्याची माहिती देणारे अनेक फोन पोलिसांना आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांना नदीतून बाहेर काढले. अपघातानंतर दोन पीडितांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या आयुक्त जेसिका टिश यांच्या मते, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, दोन जखमींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर या अपघाताबद्दल पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले, "हडसन नदीत भयानक हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. पायलट, दोन प्रौढ आणि तीन मुले, आता आपल्यात नाहीत. अपघाताचा व्हिडिओ भयानक आहे, वाहतूक सचिव शॉन डफी आणि त्यांचे कर्मचारी या आपघाताची चौकशी करत आहेत. हा अपघात कसा झाला याबबात अधिकची माहिती ते देतील."
दरम्यान या अपघाताचे व्हिडिओ एक्सवर व्हायरल होत आहेत, ज्यात अपघाताचा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. काही व्हिडिओक्लिप्समध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी ते हवेत भरकटताना दिसत आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\