नवी दिल्ली : (Tahawwur Rana Extradiction) मुंबईतील २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात येत आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल दिल्यानंतर भारतीय पथक त्याला आणण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले होते. राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन जाणारे विशेष विमान दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर उतरले आहे. येथून तहव्वूर थेट एनआयएच्या मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आणि गुप्तचर संस्था रॉ यांचे संयुक्त पथक बुधवारी तहव्वूरला घेऊन अमेरिकेतून रवाना झाले होते. भारतात परतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. आणि नंतर त्याला न्यायालयात सादर केले जाईल. राणाला दिल्लीच्या तिहार तुरुंगात उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. यासाठी तुरुंग प्रशासनाने आवश्यक ती व्यवस्था केली आहे. तथापि, त्याला कधी आणि कोणत्या वॉर्डमध्ये ठेवायचे याचा अंतिम निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतरच घेतला जाईल. राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाऊ शकते. हजर होण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
माध्यमांच्या वृत्तानुसार, राणाच्या प्रत्यार्पणाबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच विमानतळावर SWAT कमांडो देखील तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (CAPF) सुरक्षा शाखा आणि स्थानिक पोलिस विमानतळाबाहेर उपस्थित आहेत. दरम्यान, या खटल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंदर मान यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी रात्री एक राजपत्रित अधिसूचना जारी करून तीन वर्षांसाठी या खटल्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
तहव्वूर राणा यांना २००९ मध्ये एफबीआयने अटक केली होती. राणा यांना अमेरिकेत लष्कर-ए-तैयबाला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. आतापर्यंत त्याला लॉस एंजेलिसच्या एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तहव्वुरने भारतात येऊ नये म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली. त्यांच्या याचिकेत त्यांनी स्वतःला पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते आणि म्हटले होते की जर त्यांना भारतात पाठवले गेले तर त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात.तहव्वूर राणाला भारतात आणण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी बुधवार दि. ९ एप्रिल रोजी गृह मंत्रालयात बैठक घेतली होती. त्याच्या प्रत्यार्पणामुळे हल्लेप्रकरणातील तपासप्रक्रियेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेले प्रयत्न
२०११ मध्ये, भारताच्या एनआयएने राणाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
भारताने सर्वप्रथम ४ डिसेंबर २०१९ रोजी राजनैतिक माध्यमातून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
१० जून २०२० रोजी राणा यांच्या तात्पुरत्या अटकेची मागणी केली होती.
फेब्रुवारी २०२१ मध्ये, भारताने अधिकृतपणे अमेरिकेच्या न्याय विभागाला प्रत्यार्पणाची मागणी करणारे एक पत्र पाठवले होते.
२२ जून २०२१ रोजी अमेरिकेच्या संघीय न्यायालयात राणाच्या प्रत्यार्पणावरील सुनावणीदरम्यान भारताने पुरावे सादर करण्यात आले होते.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\