नव्या फीचरसह आधार ॲप लाँच! आता आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही, नवीन ॲपचा कसा फायदा होणार? जाणून घ्या एका क्लिकवर...

    10-Apr-2025   
Total Views |

New Aadhaar App Launched
 
New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते. अश्यावेळी अनेकदा ते गहाळ होण्याचीही शक्यता असते. मात्र आता ही चिंता कायमची मिटणार आहे. आधार कार्डचा वापर अधिक सुलभ आणि सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी आधार कार्ड संदर्भात एका विशेष फीचरसह नवीन ॲप लाँच केले आहे. जो प्रत्यक्षात वापरकर्त्यांच्या डेटाची गोपनीयता राखेल. त्यामुळे वापरकर्त्यांना आधार कार्ड किंवा त्याची फोटो कॉपी, झेरॉक्स घेऊन फिरण्याची आवश्यकता राहणार नाही. तर आधार कार्ड संदर्भात काय आहे नवं फीचर? या नवीन आधार ॲपचा भारतीयांना कसा फायदा होणार? याविषयी माहिती जाणून घ्या...
 
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेस आयडी ऑथेंटिकेशन फीचरसह यूआयडीएआयने नवं अ‍ॅप तयार केल्याची माहिती दिली. आधार ऑथेंटिकेशनसाठी नवीन ॲप लाँच झाल्यानंतर, वापरकर्त्यांना हॉटेलपासून विमानतळापर्यंत कुठेही आधार कार्ड किंवा त्याची प्रत घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) त्याची चाचणी करत आहे. सध्या लाँच करणयात आलेलं अ‍ॅप बेटा स्वरुपाचं असून तपासणीच्या टप्प्यात आहे. याची चाचणी यशस्वी झाल्यास ते सर्वांसाठी लाँच केले जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील माहिती देताना एक्स प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे नवीन आधार ॲप कसे काम करते, त्याबद्दलचे चित्रीकरण दाखवले आहे. यात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रथम एक क्विक रिस्पॉन्स कोड (QR Code) स्कॅन करावा लागेल, त्यानंतर त्याच ॲप सेल्फी कॅमेऱ्याद्वारे तुमच्या चेहऱ्याची पडताळणी होईल. मिळालेल्या माहितीनुसार, या ऑथेंटिकेशनमध्ये फक्त आवश्यक असलेले मूलभूत तपशील शेअर केले जातील. या व्हिडिओसोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 'नवीन आधार ॲप, फेस आयडी ऑथेंटिकेशन व्हाया मोबाईल ॲप. नो फिजिकल कार्ड, नो फोटोकॉपी' असे त्यांनी म्हटले आहे.
 
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या सहकार्याने तयार केलेल्या या ॲपमध्ये क्यूआर कोड आधारित इन्स्टंट व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशनसाठी रिअल टाइम फेस आयडीची सुविधा आहे. त्यामुळे लोकांना प्रत्यक्ष फोटो कॉपी किंवा कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे आधार कार्डाची पडताळणी करणे आता यूपीआय पेमेंट करण्याइतके सोपे झाले आहे, असे अश्विन वैष्णव यांनी एक्स वरील पोस्टमध्ये सांगितले आहे. हे नवीन आधार ॲप लाँच झाल्यानंतर वापरकर्त्यांना प्रवास, हॉटेल चेक इन किवा अगदी खरेदी करताना आधार कार्ड जवळ बाळगण्याची किंवा त्याची झेरॉक्स प्रत देण्याची आवश्यकता राहणार नाही. या ॲपची लवकरच चाचणी होईल आणि देशभरात मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जाईल. नवीन ॲपमुळे व्यक्तींना त्यांच्या आधार कार्डची प्रत्यक्ष झेरॉक्स दाखवण्याऐवजी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांची ओळख पडताळून पाहता होईल. हे ॲप १०० टक्के डिजिटल व सुरक्षित आहे आणि वापरकर्त्यांच्या संमतीनेच त्यातील माहिती शेअर करता येते. नवीन आधार ॲपसह वापरकर्त्यांना फक्त आवश्यक डेटा शेअर करण्याची परवानगी असेल, ज्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक माहितीवर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल.
 
फेस आयडी आधारित ऑथेंटिकेशन व्यतिरिक्त नवीन आधार ॲपमध्ये क्यूआर कोड पडताळणी फीचरदेखील असेल, ज्यामुळे आधार पडताळणी जलद आणि अधिक कार्यक्षम होईल. ज्याप्रमाणे भारतातील जवळजवळ प्रत्येक पेमेंट पॉइंटवर यूपीआय पेमेंट क्यूआर कोड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आधार पडताळणी क्यूअर कोडदेखील लवकरच ऑथेंटिकेशन पॉइंट्स उपलब्ध होतील. नवीन आधार ॲप वापरून लोक फक्त क्यूआर कोड स्कॅन करू शकतात आणि त्यांचा चेहरा त्वरित पडताळला जाऊ शकतो. नव्या आधार कार्ड अ‍ॅपमध्ये गोपनीयतेला प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळं वैयक्तिक माहितीचं नियंत्रण यूजरच्या हातात असेल. डेटा शेअरिंगसाठी यूजर्सची मान्यता अपेक्षित असेल, त्यामुळं गोपनीयता कायम राहील. फेस आयडी ऑथेंटिकेशन मुळं आता फक्त चेहऱ्याच्या आधारे आधार पडताळणी केली जाईल. यामुळं यूपीआय पेमेंट प्रक्रिया सोपी होईल. यूआयडीएआयच्या दाव्यानुसार अ‍ॅप १०० टक्के डिजिटल आणि सुरक्षित असल्यानं यामध्ये डेटा सोबत छेडछाड करता येणार नाही. यामुळं डेटा लीक होणार नाही, याचा दुरुपयोग होणार नाही. डिजिटल इंडिया कार्यक्रमानुसार या अ‍ॅपमुळे पेपरलेस गव्हर्नंसला प्रोत्साहन मिळेल. ज्यामुळे आधार कार्डशी संबंधित कामं डिजिटली पूर्ण होतील.
 
 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\