भारतीय कंपन्यांना सवलतीच्या दरात वस्तु विकण्यास सुरुवात
10-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली : अमेरिकेने लादलेल्या प्रचंड आयातशुल्काच्या दट्ट्यातून वाचण्यासाठी चीनकडून आता भारताची मनधरणी सुरु झाली आहे. चीनी उत्पादक कंपन्यांकडून आता भारतीय कंपन्यांना सवलत देण्यास सुरुवात झाली आहे. चीनी इलेक्ट्रीक कंपन्या आता भारतीय कंपन्यांना आपला माल हा ५ टक्के सवलतीच्या दरात विकण्यास तयार झाल्या आहेत. त्यामुळे आता अमेरिका, चीन या दोन देशांच्या व्यापारयुध्दात भारतासाठी संधी निर्माण व्हायला लागल्या आहेत.
चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुध्द
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयातशुल्कातून इतर देशांना सुट दिलेली असली तरी त्यांनी चीनवर लादलेले आयातशुल्क १२५ टक्क्यांवर नेले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणुन चीनकडूनही अमेरिकी वस्तुंवर ८५ टक्के आयातशुल्क लादले गेले आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांना प्रत्युत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारतूट ही २९५.४ बिलीयन डॉलर्स इतकी प्रचंड आहे. त्यामुळे अमेरिकेकडून ही व्यापार तूट कमी करण्यासाठी चीनवर आयातशुल्क लावले आहे. त्यामुळे दोन्ही देशांत आता व्यापारयुध्द सुरु झाले आहे.
भारताला याचा कसा लाभ होणार?
या व्यापारयुध्दामुळे भारतासाठी मोठ्या संधी उभ्या राहू शकतात. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांकडून तसे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. चीन कडून भारतीय कंपन्यांना सुट देण्यास सुरुवात झाली आहे. या मिळणाऱ्या सवलतीमुळे भारतीय बाजारात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तु जसे की टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन्स यांसारख्या वस्तु स्वस्त होऊ शकतात. त्याचा फायदा भारतीय ग्राहकांना होऊ शकतो. त्याच बरोबर अमेरिकेकडून या आयातशुल्कातून भारताला ९० दिवसांची सवलत देण्यात आली आहे. ज्याचा फायदा म्हणून भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आपले द्विपक्षीय संबंध बिघडू नयेत यासाठी द्विपक्षीय करारासाठी अनुकुलता दर्शवली आहे.
भारताने अधिक सजगतेने भूमिका बजावणे गरजेचे – संगीता गोडबोले
अमेरिका – चीन या दोन देशांच्या व्यापारी युध्दात भारताला सध्या फायदा दिसत असला तरी भारताने अधिक सजगतेने काम करणे गरजेचे आहे. मुळात चीन आपल्या मालाचे डंपिंग भारतात करु शकते जे भारतीय उद्योगांसाठी घातक ठरु शकते. त्यामुळे भारताच्या अँटी डंपिंग विभागाने सजग राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आता चीन इतर छोट्या देशांवर त्यांचा माल विकत घेण्याची जबरदस्ती करु शकतो. त्यातून भारतावरही दबाव तयार होऊ शकतो. यातून भारताला अधिक सजग राहून काम करणे गरजेचे ठरते. त्यासाठी अमेरिकेशी द्विपक्षीय वाटाघाटी यशस्वी करुन त्यातून आपल्या पदरात जास्तीत जास्त फायदा कसा पाडून घेता येईल याला भारताचे प्राधान्य असले पाहिजे असे मत माजी भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाच्या अभ्यासिका संगीता गोडबोले यांनी मांडले आहे.