अमरावती : विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत इंटरनॅशनल लीडर आहेत. त्यामुळे त्यांनाच प्रश्न विचारू द्या आणि त्यांनाच उत्तरे देऊ द्या, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. गुरुवार, १० एप्रिल रोजी त्यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला.
तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षाचा गटनेता म्हणून बोलावे लागते. पण ज्याने महाराष्ट्राशी खेळ केला आणि त्यामुळे इतक्या मोठ्या लोकांचा जीव गेला त्याला आता भारतात आणण्यात आले आहे. त्यांच्यात काही संवेदनशीलता असायला हवी. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे अभिनंदन करायला हवे होते. विजय वडेट्टीवार यांच्या मनात वेगळे आणि तोंडात वेगळे आहे. मला अमरावती जिल्ह्याच्या विकासाबद्दल विचारा. विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत हे इंटरनॅशनल लीडर आहेत. त्यामुळे त्यांनाच प्रश्न विचारू द्या आणि त्यांनाच उत्तरे देऊ द्या."
"तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे आतंकवाद्यांच्या मनात भारताबद्दल एक दहशत निर्माण झाली आहे. आपण जगातील कुठल्याही देशात लपून बसलो तरी भारत देश आपल्याला शोधून काढून शिक्षा देईल, असा संदेश आतंकवाद्यांमध्ये जाईल. त्यामुळे देशाच्या इतिहासातील ही नोंद घेण्यासारखी ही घटना आहे," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही लोकांना पाच वर्षांचा संकल्पनामा दिलेला आहे. आमचे सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ त्यावेळी आमच्या संकल्पपत्रातील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. विरोधकांना शब्दही फुटणार नाहीत, एवढा विकास आण्ही करणार आहोत. १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती येथे व्यावसायिक विमाने सुरु करण्यासाठी येत आहेत. त्याच दिवशी ८०० कोटी रुपयांचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. यासोबतच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे," असेही त्यांनी यावेळी सांगितले.