अभिनेता शशांक केतकर पुन्हा रंगभूमीवर, ‘११ वपुर्झा’साठी सज्ज; चाहत्यांना आनंदाची बातमी देत म्हणाला,"व.पु. काळेंच्या कथा आजही तितक्याच..."

09 Mar 2025 13:21:58




marathi actor shashank ketkar returns to theatre with 11 vapurza upcoming marathi drama


मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर लवकरच रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमांमध्ये आपली छाप उमटवल्यानंतर आता तो पुन्हा एकदा नाटकासाठी सज्ज झाला आहे. शशांक शेवटचा गोष्ट तशी गमतीची या नाटकात दिसला होता. अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात त्याने लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासोबत काम केलं होतं. मात्र, या नाटकानंतर तो फारसा रंगभूमीवर दिसला नव्हता. आता तो ‘११ वपुर्झा’ या विशेष नाट्यप्रयोगात झळकणार आहे.
 
 
 
शशांकने नुकतेच सोशल मीडियावर ११ वपुर्झा या नाट्यप्रयोगाचे पोस्टर आणि काही फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “रंगमंचावर असणं आणि आपल्या आवडत्या लेखकांनी लिहिलेलं सादर करायला मिळणं हे भन्नाट आहे. व.पु. काळेंच्या कथा आजही तितक्याच हसवतात, रडवतात, आरसा दाखवतात आणि चिमटे काढतात. मी, सुनील बर्वे आणि व.पु. काळे यांची कन्या स्वाती काळे चांदोरकर… आम्ही तयार आहोत तुम्हाला पुन्हा त्या कथा-कथनाच्या आणि पत्र-वाचनाच्या काळात घेऊन जायला…”


या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. शशांकच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया येत असून, "आतुरतेने वाट पाहत आहोत," "शुभेच्छा शशांक!" अशा शब्दांत चाहते आणि कलाकार मंडळी त्याचे अभिनंदन करत आहेत. ‘११ वपुर्झा’ हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी एक खास पर्व ठरणार आहे. व.पु. काळेंच्या अमर कथा पुन्हा एकदा रंगभूमीवर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.



Powered By Sangraha 9.0