मुंबई : "आपल्याला इरावतीबाई कर्वे यांचे कार्य केवळ युगांत या ग्रंथपुरतेच ठाऊक असते, परंतु इरावतीबाईंनी आपल्या कार्यातून भारतीयत्वाचा शोध घेतला हे आपण विसरता कामा नये, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रतिभा कणेकर यांनी व्यक्त केले. ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयातील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषद (ठाणे जिल्हा शाखा) यांच्यावतीने डॉ. इरावती कर्वे : व्यक्ती आणि कार्य या विषयावर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष पद्माकर शिरवाडकर यांनी इरावती कर्वे यांच्या जीवनाचा संक्षिप्त परिचय करून दिला. याप्रसंगी सुप्रसिध्द साहित्यिक प्रतिभा कणेकर यांनी इरावती कर्वे यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवले. इरावती कर्वे या भारतातील पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ होत्या. दिनकरराव कर्वे यांच्याशी झालेल्या विवाहानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांचे परदेशातील शिक्षण, संशोधन याविषयी विस्तृत माहिती त्यांनी दिली. आपल्या संशोधनातून इरावती बाईंनी वसाहतवादी आकलनाला कसा छेद दिला यावर त्यांनी विस्तृत विवेचन केले. भारतातील जाती व्यवस्था, पाश्चिमात्य देशातील वंशवादापेक्षा वेगळी आहे या त्यांच्या प्रबंधावर सुद्धा प्रतिभा कणेकर यांनी भाष्य केले. मराठी संस्कृतीवर त्यांनी केलेले अभ्यासपूर्ण संशोधन आज सुद्धा किती सयुक्तिक आहे याचे त्यांनी दाखले दिले. त्यांच्या लेखनाव्यतिरिक्त इरावती बाईंनी कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन कसे करावे याबद्दल इरावती बाईंनी त्यांच्या काळात मांडलेले विचार सुद्धा प्रतिभा कणेकर यांनी प्रकट केले.
भाषिक आक्रमणाला उत्तेजन देऊ नये!
इरावती बाईंच्या साहित्याचा वेध घेताना प्रतिभा कणेकर यांनी इरावती बाईंच्या भाषेसंदर्भातील विचारांचा एक उतारा वाचून दाखवला ज्यात इरावती कर्वे म्हणतात "कुठल्याही प्रकारे आपण भाषिक आक्रमणाला उत्तेजन देता कामा नये तसेच हिंदीला विरोध म्हणजे राजद्रोह नव्हे. आपण आपली भाषिक विविधता जपली पाहिजे."