सांस्कृतिक विभागाचा लोककलांचा जागर

    09-Mar-2025
Total Views |
cultural department folk arts


लोककला हे मायमराठीचे वैभव. महाराष्ट्रात अनेक लोककला आढळतात. मात्र, आज या लोककलांकडे प्रेक्षक येत नाहीत हे सगळ्याच लोककलावंतांचे दु:ख आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या लोककलावंतांचे दु:ख समजून घेऊन, या लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध भागांमध्ये लोककला महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या लोककलांविषयी संचालनालयाच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 98व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षा प्रा. डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलांच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक असतानादेखील ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’ने या संमेलनात, ‘लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोककला’ यांवर चर्चासत्र आयोजित करण्याचे टाळले हे एक कटू सत्य आहे. किंबहुना, अध्यक्षांनी महामंडळाला तसे सुचवले असतानाही, महामंडळाने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. असे असताना, दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मात्र, फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांत विविध लोककलांचा जागर घडविणारे महोत्सव संपूर्ण राज्यभर आयोजित केले. तसेच, औचित्यपूर्ण परिसंवादही आयोजित केले, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी अलीकडेच, ‘लोककला आणि नाटक’ या क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे आहे, असे जाहीर केले. लोककला महोत्सवांचे आयोजन, हे या संशोधनाला पूरक असल्याचे सिद्ध होत आहे. भजन स्पर्धा, शाहिरी महोत्सव, लावणी महोत्सव, तमाशा महोत्सव, खडी गंमत महोत्सव, वही गायन महोत्सव, दशावतार महोत्सव असे अनेक महोत्सव, राज्याच्या ‘सांस्कृतिक कार्य संचालनालया’तर्फे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले आणि ते यशस्वीही झाले.
 
‘सांस्कृतिक कार्य संचालनालया’तर्फे राज्याच्या कृषी विद्यापीठातील, प्रयोगात्मक कला विभागांतर्फे राज्यातील लोककलांचे सर्वेक्षण आणि ध्वनिचित्र मुद्रण करण्यात आले आहे. अतिशय माहितीपूर्ण ‘डाटा’ या निमित्ताने शासनाकडे जमा झाला आहे. आता त्याचे वर्गीकरण, विश्लेषण आणि संशोधन होणे गरजेचे आहे. संकलनाच्या पातळीवर ज्या ज्या महत्त्वपूर्ण लोककलांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे, त्यांच्या संशोधनासाठी नवे अभ्यास गट सांस्कृतिक कार्य विभागाने स्थापन करणे गरजेचे आहे. दशावतार, खडी गंमत, ढोलकी फडाचा तमाशा, संगीत बारीचा तमाशा, शाहिरी या लोककलांना, शासनाने सन 2007 पासून आर्थिक अनुदान पॅकेज तसेच, भांडवली खर्चासाठी अनुदान पॅकेज सुरू केले.
 
कारण, या कलावंतांचा चरितार्थ या व्यावसायिक लोककलांवर आहे, याचा विचार प्रामुख्याने शासनाद्वारे केला गेला. त्यानंतर या सर्वच कलाप्रकारांसाठी महोत्सव आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली ,नि आता हे दरवर्षाचे उपक्रम झाले. तमाशा शिबीर, शाहिरी शिबीर, दशावतार शिबीर, कीर्तन शिबीर अशी विविध शिबिरे आयोजित करताना, गुरू-शिष्य परंपरेचे सूत्र सांस्कृतिक कार्य विभागाने अंगीकारले. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, हे उपक्रम सुरू आहेत. यंदाचा दशावतार महोत्सव नवी मुंबईत आयोजित झाला, तर तमाशा महोत्सव सातारा येथे आयोजित करण्यात आला होता. लावणी महोत्सव नुकताच मिरज येथे पार पडला, तर शाहिरी महोत्सव, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला होता. वही गायन महोत्सवाचे आयोजनदेखील, अलीकडेच खानदेशात करण्यात आले होते. या पद्धतीने प्रादेशिक समतोल राखण्याचे कार्य आणि सांस्कृतिक विकेंद्रीकरणाचे कार्य, या विभागाने यशस्वीरित्या साध्य केले.

सातारच्या तमाशा महोत्सवात, तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनी एक खंत व्यक्त केली की, “गाव जत्रांमध्ये तमाशाचा पारंपरिक बाज सादर करण्याचे प्रयत्न जरी आम्ही करीत असलो, तरी मायबाप प्रेक्षक त्याला साथ देत नाहीत. प्रेक्षकांना चित्रपटांची गाणीच आवडतात. रंगबाजी आवडते. मात्र, वग सुरू झाला की, प्रेक्षक पाठ फिरवतात.” खरंतर ढोलकी-हलगीची जुगलबंदी म्हणजे सलामी. गण, मुजरा, गवळण, रंगबाजी, वग आणि भैरवी हा पारंपरिक ढोलकी फडाच्या तमाशाचा अविष्कार क्रम. राज्य शासनाने भरविलेल्या तमाशा महोत्सवात, हा अविष्कार क्रम लोककलावंत कसोशीने पाळतात. मात्र, गावजत्रेत त्यांना ‘मागणी तसा पुरवठा’ हे तंत्र स्वीकारावे लागते, हे कटू सत्य आहे.

दशावतारात पूर्वरंग आणि उत्तररंग सादर होतो. पूर्वरंगाला ‘आड दशावतार’ असेही म्हणतात. या आड दशावतारामध्ये, गणेशाला वंदन, रिद्धी-सिद्धी, सरस्वती, संकासुर, भटजी, ब्रह्मदेव, विष्णू ही पात्रे असतात. नवी मुंबई येथे आयोजित झालेल्या दशावतारात, कोकणातील कलावंतांना संधी देण्यात आली. तर तमाशा महोत्सवात, प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील कलावंतांना संधी देण्यात आली. मिरज येथे आयोजित झालेल्या लावणी महोत्सवात, मोडनिंब, चौफुला, वेळा, सणसवाडी अशा पारंपरिक संगीतबारी कला केंद्रांवरील कलावंतांना, संधी प्राप्त करून देण्यात आली. या लावणी महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या परिसंवादात गाजलेला मुद्दा होता तो, सध्या कलाकेंद्रांवर सुरू असलेल्या डीजेचा. डीजेमुळे पारंपरिक तमाशातील वादकांवर अन्याय होतो आहे आणि संगीतबारीचा तमाशा कुठेतरी ‘आयटम साँग‘कडे झुकतो आहे. परिणामी पारंपरिक लावणीकडे दुर्लक्ष होत आहे! नाट्य-चित्रपट क्षेत्रातील, कलावती लावणी नृत्य करू लागल्या आहेत.

पण, त्यामुळे लावणी अभिजात झाली असे नाही, उलट मूळ लावणीच अभिजात होती आणि तीच आंतरराष्ट्रीय पातळीवर गेली. तिला राष्ट्रीय सन्मान मिळाला तो यमुनाबाई, सत्यभामाबाई, सुलोचनाबाई, रोशन सातारकर यांसारख्या नामवंत कलावंतांमुळे, असे मत या परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश खांडगे होते, तर वक्ते म्हणून प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. रामप्रसाद तौर, सिनेनाट्य अभिनेत्री हेमसुवर्णा मिरजकर, लावणीसम्राज्ञी प्रमिला लोदगेकर आणि पत्रकार खंडूराज गायकवाड या मान्यवरांनी, परिसंवादात भाग घेतला. महत्त्वाचे म्हणजे शासनातर्फे आयोजित होणारी प्रशिक्षण शिबिरे ही केवळ 15 दिवसांची न ठेवता, किमान तीन महिन्यांची असावीत, अशी सूचना या परिसंवादातून करण्यात आली. “महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, तमाशा, कीर्तन, शाहिरी आदी शिबिरे आयोजित करीत असतो. त्यातून वाद्यवादन, अभिनय, नर्तन आदी प्रशिक्षण दिले जाते,” असे सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संदीप बलखंडे यांनी सांगितले. मिरज येथील लावणी महोत्सवाचे यशस्वी संयोजन करण्यात, सुरेश बापू आवटी आणि बलखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

एकूणच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित झालेल्या, विविध लोककलांच्या महोत्सवातून कलावंतांना कला सादरीकरणाची संधी तर प्राप्त झालीच. पण, त्याहीपेक्षा सांस्कृतिक विकेंद्रीकरणाला चालना मिळाली, हे सत्य नाकारता येत नाही. राज्याचे सांस्कृतिक धोरण, महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे आणि आता त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली, सांस्कृतिक धोरणाची समिती शासनाने जाहीर केली होती. आता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी वेगळा गट निर्माण करण्यात आला आहे. “कौशल्य विकासाच्या अंतर्गत, कलाक्षेत्राचा विचार करून, रोजगाराच्या संधी कलाक्षेत्रात कौशल्य विकास धोरणाच्या अंतर्गत प्राप्त व्हाव्यात,” असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.

मिरजेत लावणी महोत्सव सुरू असतानाच, जवळच असलेल्या सांगलीत, यंदाच्या 98व्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’च्या अध्यक्ष प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “लोकसंस्कृती हा आपल्या मूळ संस्कृतीचा पाया आहे. किंबहुना लोकसंस्कृती ही मातृसंस्कृती आहे आणि या मातृसंस्कृतीला बळ देण्याचे काम बोलीभाषा तसेच, लोककला करत असतात. तेव्हा बोलीभाषा काय किंवा लोककला काय, त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.” डॉ. तारा भवाळकर यांनी केलेल्या या मार्गदर्शनानुसारच, एकप्रकारे सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे काम सध्या सुरू आहे. राज्यपातळीवर वेगवेगळ्या लोककलांचे आयोजन करून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने आपल्याला या लोकसंस्कृतीप्रति किती आस्था आहे, तेच सिद्ध केले आहे!


प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
9821913600