जागतिक महिला दिनी मुंबई शेअर बाजारात अहिल्यादेवींचा कार्यगौरव!

09 Mar 2025 12:59:27
bombay stock exchange honoured ahilyadevi holkar


मुंबई :   
 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती' आणि 'बीएसई' अर्थात 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' (मुंबई शेअर बाजार) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ८ मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर स्वामी विज्ञानानंद हे प्रमुख अतिथी म्हणून तर, ज्येष्ठ सनदी अधिकारी (निवृत्त) के. रत्न प्रभा या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला उद्योग आणि अर्थकारण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहिले.
 
भारताच्या समाजकारणाला आणि एकूणच देशाला अत्यंत सकारात्मक दिशा देणाऱ्या प्रेरणास्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे.यानिमित्ताने जगभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच श्रृंखलेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या अर्थकारणातील योगदानाची सविस्तर माहिती उद्योग व अर्थकारण क्षेत्रातील मान्यवरांना व्हावी, तसेच या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी या उद्देशाने 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'च्या सहकार्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना विशेष अतिथी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अहिल्यादेवींना वंदन करत त्यांच्या कार्याची प्रेरणा घेउन आपण सर्वांणी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान देणे आवश्यक आहे,असे संबोधन केले.
 
यानिमित्ताने त्यांनी समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या www.ahilyadevi.org या संकेतस्थळाचे उद्घाटनही केले. प्रमुख अतिथी स्वामी विज्ञानानंद यांनी हिंदू पतपातशाहित सर्वश्रेष्ठ योगदान देणाऱ्या छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज , महाराणा प्रताप,राणी लक्ष्मीबाईंसारख्या अनेकांसह अहिल्यादेवींच्या योगदानाबद्दल माहिती दिली.प्रमुख वक्ता ज्येष्ठ सनदी अधिकारी (निवृत्त) के. रत्न प्रभा यांनी अहिल्यादेवींच्या उद्योगक्रांतीचे अनुकरण करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुंबादेवी भारतद्नार नगर कार्यवाह विष्णू वझे यांनी केले. तर सूत्रसंचालन समिती संयोजक गणेश पुराणिक आणि धीरज बोरीकर यांनी केले. समिती सचिव मनिषा मराठे यांच्या वतीने कार्यक्रमात उपस्थितांचे,आयोजकांचे आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 
Powered By Sangraha 9.0