टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीत किवींवर दमदार विजय, रोहित शर्माची झंझावात खेळी

    09-Mar-2025
Total Views |

Champions Trophy 2025
 
दुबई : टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) दुबईमध्ये ९ मार्च रोजी पार पडली. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने किवींना पराभवाची धूळ चारली आहे. किवींनी नाणेफेकी जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये किवींनी २५१ धावा करत २५२ धावांचे टीम इंडियाला आव्हान दिले. टीम इंडियाने अंतिम षटकापर्यंत झुंझ देत पाकिस्तान पुरस्कर्ते चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरत विजय संपादन केला. यामध्ये विशेषकरून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची विजयी खेळी  कौतुकास्पद आहे.
 
कर्णधार रोहित शर्माने या चॅम्पियन्स ट्रॉफीत एकही सामन्यात नाणेफेकी जिंकली नाही. मात्र टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असताना त्याने प्रत्येक संघांना पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून दिली. अशातच रचिनला दोन वेळा जीवदान मिळाले. कुलदीप यादवच्या फिरकीने रचिन क्लिन बोल्ड बाद झाला. रचिनने २९ चेंडूत ३७ धावा केल्या, तर यंगने १५ धावा करत तंबूचा रस्ता गाठला. या दोन खेळाडूंच्या बाद होण्याने टीम इंडियाने खेळावर पकड निर्माण केली.
 
त्यानंतर केन विल्यम्सन १४ चेंडू खेळत ११ धावा करत कुलदीप यादवने त्याला बाद केले. डॅरेल मिचेल आणि टॉम लॅथन ही जोडी मैदानात आग ओकत फलंदाजी करत होती. त्यावेळी रवींद्र जडेजाने टॉम लॅथनला एलबीडब्ल्यू बाद केले. त्यानंतर फिलिप्सने चांगली कामगिरी करत ५२ चेंडूत ३४ धावा केल्या असून वरूण चक्रवर्तीने फिलिप्स स्वरूपात पाचवा गडी तंबूच्या आश्रयाला पाठवला.
 
 
 
तसेच किवींनी ४५ षटकात ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. मायकल ब्रेसवेल २४ आणि डैरेल मिचेल ५३ धावांवर खेळत होते. त्यानंतर मोहम्मद शमीने निर्णायक क्षणी डॅरेल मिचेल याला बाद करत न्यूझीलंडला सहावा झटका दिला आहे. शमीने यासह वैयक्तिक पहिली विकेट मिळवली. डॅरेल मिचेल याने ६३ धावा करत किवींना सातवा धक्का बसला आहे. विराट कोहलीने जबरदस्त थ्रो करत त्याची विकेट काढली. अंतिम षटकापर्यंत किवींनी २५१ धावा करत टीम इंडियाला २५२ धावांचे आव्हान दिले.
 
टीम इंडियाची विजयी कामगिरी
 
टीम इंडियाचे सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली कामगिरी केली. रोहित शर्माच्या कर्णधार खेळीचे कौतुक होत आहे. रोहित शर्माने सुरूवातीलाच चांगली खेळी करत ५८ वे अर्धशतक केले. किवीचा गोलंदाज फिलिप्सने अप्रतिम झेल घेत शुबमन गिलला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गिलने ५० चेंडू खेळत केवळ ३१ धावा केल्या आहेत. तर रणमशीन विराटला खास कामगिरी करता आली नाही. त्याने केवळ १ धाव करत तंबूचा आश्रय धरला, त्याला एलबीडब्लूय स्वरूपात बाद केले. त्यानंतर रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का बसला. रोहितने अर्धशतक करत ७६ धावांची झुंझार खेळी खेळली असून रचिन रवींद्रने त्याला बाद केले.
 
जडेजाचा विजयी चौकार  
 
उर्वरित समीकरण हे ९१ चेंडू आणि ९० धावा असताना खेळपट्टीवर श्रेयश अय्यर आणि अक्षर पटेल खेळत होते. दरम्यान श्रेयश अय्यर झेलबाद स्वरूपात बाद झाला. श्रेयश अय्यरच्या स्वरूपात टीम इंडियाला पाचवा धक्का बसला. त्यानंतर मोक्याच्या वेळी   के. एल राहुल आणि हार्दिक पांड्याने संघाची कमान सांभाळली. यावेळी हार्दिकने मोठा फटका मारण्याच्या नादात हार्दिकप पांडया झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने केवळ १५ चेंडू खेळत निर्णायक ११ धावा करत बाद झाला. पांड्यानंतर टीम इंडियाचा फलंदाज रविंद्र जडेजाने अंतिम षटकात विजयी चौकार लगावत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं.